वाल्हेत रेल्वे रुळावर आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह
वाल्हे प्रतिनिधी ; सिकंदर नदाफ
पुरंदर तालुक्यातील वाल्हे हद्दीतील दातेवाडी नजीक रेल्वे रुळावर एका २९ ते ३० वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह छिन्न-विछिन्न अवस्थेत आढळून आला .या घटनेची माहिती रेल्वे कर्मचारी किशोर जन्नोलग यांनी वाल्हे पोलीस दुरक्षेत्राला दिली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दातेवाडी येथील रेल्वे ट्रॅक ७२ /३-४ वर बुधवार (दि.६ डिसेंबर) रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास एका अज्ञात इसमाचा मृतदेह छिन्न-विछिन्न अवस्थेत रेल्वे कर्मचाऱ्यांना सापडला होता.
मृत इसमाच्या अंगावर पिवळ्या रंगाचा सदरा व फिक्कट निळ्या रंगाची जीन्स पँट, उजव्या हातामध्ये पांढऱ्या रंगाचे धातूचे कडे, मनगटावर इंग्रजीमध्ये सीमा असे नाव गोंदले आहे.तर डाव्या हाताच्या पोटरीवर त्रिशूळ चिन्ह गोंदले असून डाव्या कानामध्ये पिवळ्या धातूची बाळी असल्याचे पोलिसांकडून नमूद करण्यात आले आहे.
या वर्णनानुसार अनोळखी इसमाच्या परिचितांनी जेजुरी पोलीस ठाण्याशी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन वाल्हे पोलीस चौकीचे हवालदार दीपक काशीद यांनी केले आहे.