बारामती ! स्तुत्य उपक्रम ...त्या शाळेतील विद्यार्थीनी दिवाळीच्या सुट्टीतही.... त्यांच्या झोपडी ,तंबूंसमोर रांगोळी काढली... आकाशकंदील लावला अन फराळ वाटप केले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूल, बारामती.
म.ए.सो हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूलने साजरी केली आगळीवेगळी दिवाळी
दिसेना जनी तेचि शोधुनि पाहे|
बरे पाहता गूज तेथेचि आहे ||
वरील उक्तीस साजेशी कृती करत आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी समाजात अस्तित्व असणाऱ्या परंतु दुर्लक्षित झालेल्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहचून आनंदाने दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न केला. हे करत असताना विविध कारणांमुळे आपल्या कुटुंबापासून दुरावलेल्या मुलांना, महिलांना तसेच फेरीवाल्यांना, कामानिमित्ताने आपले गाव,शहर सोडून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला दिवाळीचा आनंद घेता यावा म्हणून शाळेकडून दिवाळी फराळ, आकाश कंदिलांचे वाटप केले. तसेच ऐन दिवाळीच्या सुट्टीतही विद्यार्थ्यांनी आपल्या घासातला घास देत ठिकठिकाणी भेटी देऊन फराळाचे वाटप केले. त्यांच्या झोपडी व तंबूंसमोर रांगोळी काढून आकाशकंदील लावून,फराळ आणि इतर आवश्यक साहित्याचे वाटप केले.
शिक्षण आणि संस्कार यांची योग्य सांगड घालून लहान वयातच विद्यार्थ्यांच्या मनात प्रेम, आपुलकी आणि माणुसकी रुजविण्याचे काम या कृतीतून घडताना आपल्याला दिसते.
"क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे" या वचनाला जागून १८६० पासून ज्ञानदान व समाजहिताचे अविरत कार्य करणाऱ्या म.ए.सो संस्थेचे विद्यार्थी नक्कीच समाजहित घडवतील.
अशा आगळ्यावेगळ्या उपक्रमाने दिवाळी साजरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे समाजातील विविध घटकांकडून कौतुक होत आहे.
वरील उपक्रम राबवताना शाला समितीचे अध्यक्ष श्री.बाबासाहेब शिंदे, महामात्र डॉ.श्री. गोविंद कुलकर्णी सर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली क्षीरसागर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.