दुधाला प्रति लिटर ४२ रुपये हमीभावा सह विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण
बारामती तालुक्यातील तरडोली येथे उपसरपंच व युवा शेतकरी सागर पंडित जाधव यांनी दुधाला प्रति लिटर ४२ रुपये हमीभावा सहीत विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. यापूर्वी केलेल्या उपोषणानंतर शासना मार्फत आश्वासन देऊनही ठोस निर्णय न झाल्याने त्यांनी पुन्हा हा उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.
तरडोली ता. बारामती येथील उपसरपंच सागर जाधव या युवा शेतकऱ्याने दिनांक १ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर या दरम्यान दुधाला प्रतिलिटर ४२ रुपये भाव मिळण्यासाठी उपोषण सुरू केले होते. १७ जुन २०२३ रोजी राज्य सरकारने राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली दूध समिती स्थापन केली होती. यानुसार ३४ रुपये प्रतिलिटर दर तीन - पाच फॅटसाठी व आठ- पाच एसएनएफ ला दुध संघाने दुध उत्पादकास प्रति लिटर दुधास दर देण्यात यावा असा आद्यादेश काढला होता.
मात्र याप्रमाणे दुध दर दिला जात नाही. यामुळे सागर जाधव यांनी आमरण उपोषण ऑक्टोबर महीन्यात सुरु केले होते. या सुरु असलेल्या उपोषणावर बारामती तहसीलदार यांनी मध्यस्थी करून जाधव यांना आश्वासीत केले होते. बारामती तहसीलदार गणेश शिंदे यांच्या मदतीने दिनांक ७ ऑक्टोबर रोजी हे उपोषण मागे घेण्यात आले होते. तहसीलदार बारामती यांनी उपोषण सोडताना दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याने सागर जाधव यांनी दिनांक ६ नोव्हेंबर पासून पुन्हा आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला आहे. या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे.
राज्यातील शेतकऱ्यांच्या दुधाला प्रती लिटर ४२ भाव मिळावा. याचबरोबर दुष्काळ सदृश्य भागात चारा डेपो करावेत. जनावरास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे. प्रत्येक गावात स्वतंत्र शासकीय पशु वैद्यकीय डॉक्टर व लॅब उपलब्ध करून देणे. दुग्ध व्यवसायासाठी दुग्ध विकास सोसायटी प्राप्त होणे. पशुखाद्यावर शासनाचे नियंत्रण असावे. जनावरांना विमा कवच योजना उपलब्ध करावी. यांसारख्या अनेक मागण्यांसाठी या युवा शेतकऱ्याने आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला आहे. याबाबत तालुक्यातील विविध शेतकऱ्यांचा त्यांना पाठिंबा मिळत असून जोपर्यंत शासन दुधाला ४२ रुपये हमीभाव देत नाही तसेच इतर मागण्या पुर्ण करीत नाहीत. तोपर्यंत हे उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे सागर जाधव यांनी सांगितले.