३० वर्ष देशाची सेवा करुन सोमेश्वर ला परतणाऱ्या ताराचंद शेंडकर जवानाचं जंगी स्वागत
सोमेश्वरनगर : सैन्य दलात भरती होऊन देशसेवा करण्याची अनेकांची स्वप्ने असतात. पण हे स्वप्न प्रत्येकाचंच पूर्ण होत नाही. सैनिक सीमेवर जीवाची बाजी लावून देशाचं संरक्षण करतात. पण हा सैनिक जेव्हा देशसेवा करुन पुन्हा एकदा घरी परततो तेव्हा प्रत्येकाचं ऊर अभिमानाने भरुन येतं. असाच क्षण बारामती तालुक्यातील सोमेश्वरला पाहायला मिळाला ३० वर्ष देशाचं रक्षण करून सुखरूप घरी परतणाऱ्या ताराचंद शेंडकर या जवानाचं सोमेश्वर पंचक्रोशीतील तसेच बारामती तालुका आजी माजी सैनिक संघटना वतीने स्वागत करण्यात आले.
ताराचंद मोतीराम शेंडकर यांनी ३० वर्ष ( EME India army) मध्ये देशसेवा केली. सेवानिवृत्त होऊन गावी आल्यानंतर सजवलेल्या चारचाकी मध्ये बसवून, बँड बाजा वाजवून त्यांच स्वागत करण्यात आलं. पारंपरिक बँडच्या तालाने स्वागतामध्ये भर टाकली. संपूर्ण गाव पुष्पगुच्छ घेऊन स्वागतासाठी उभं होतं. बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर मधील हे सर्व सेलिब्रेशन शेंडकर कुटूंबिय व बारामती तालुका आजी माजी सैनिक संघटना वतीने करण्यात आले. श्री सोमेश्वर कारखाना येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत कारखाना चेअरमन पुरुषोत्तम जगताप ,संचालक संग्राम सोरटे , राजहंस चे विजयकुमार सोरटे ,माजी संचालक रुपचंद शेंडकर पंचायत समिती सदस्य मेनका मगर,सह इतर उपस्थिती मान्यवरांनी जवान ताराचंद शेंडकर यांचे स्वागत व शुभेच्छा दिल्या..
गावकऱ्यांनी गावभरात स्वागताचे बॅनर्स लावले होते. घरोघरी रांगोळी काढण्यात आली. अचानक झालेलं हे स्वागत पाहून जवान ताराचंद शेंडकर भारावून गेले.
देशसेवा करून गावी पोहोचल्यावर संपूर्ण गाव भावुक झालं होतं. जवानाच्या स्वागताला संपूर्ण गावंच नव्हे, तर पंचक्रोशीतील नातेवाईकांनीही हजेरी लावली. यावेळी पूर्ण गाव सजून-धजून उभं होतं. सर्वात आनंद होता तो म्हणजे जवानाच्या कुटुंबीयांना… जवानाचे संपूर्ण कुटुंब आतुरतेने वाट पाहत होते. जवानाचा गावात प्रवेश होताच फुलांचा वर्षाव , फटाकडे आतिषबाजी करत कुटुंबाच्या वतीने गोड भरवून त्यांचं औक्षण करण्यात आलं. ३० वर्ष देश सेवा करून सुखरूप गावी आल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.तसेच कुटुंबातील सदस्य मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत त्यांनी देश सेवेबरोबर त्यांनी निवृत्तीनंतर आई वडील कुटूंब तसेच सामाजिक सेवेत सक्रीय राहावे तसेच उपस्थित शेंडकर कुटुंबीयांन सह आजी माजी सैनिक संघटना वातीने उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.