सोमेश्वरनगर ! मु. सा. काकडे महाविद्यालयात 'संशोधन पद्धती' (Research Methodology) या विषयावर 'एक दिवसीय कार्यशाळा संपन्न'
सोमेश्वरनगर (ता.बारामती) येथील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयामध्ये संशोधन पद्धती (रिसर्च मेथोडोलॉजी) या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे आयोजन मुख्यतः महाविद्यालयातील पदव्युत्तर आणि संशोधक विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले होते. नवीन शैक्षणिक धोरणानुसार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या पाठ्यक्रमामध्ये विशेषता पदव्युत्तर आणि संशोधन केंद्र यामध्ये संशोधन पद्धती हा विषय बंधनकारक करण्यात आलेला आहे. महाविद्यालयामध्ये एम. ए., एम. कॉम., एम. एस. सी. हे वर्ग तसेच मराठी, इतिहास आणि वाणिज्य या विषयांतील संशोधन केंद्रे चालवली जातात.
यावेळी 'संशोधन पद्धती' (रिसर्च मेथोडोलॉजी) या विषयावर महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, व्यवस्थापन परिषद सदस्य प्राध्यापक डॉ. देविदास वायदंडे सर साधनव्यक्ती म्हणून बोलत होते. संशोधनाची उद्दिष्टे वैशिष्ट्ये, कार्यपद्धती आणि आवश्यकता यावर प्राचार्य डॉ. वायदंडे सर बोलत होते. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी संशोधक वृत्ती अंगीकारली पाहिजे असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. कोणत्याही विषयात पी.एच.डी. प्राप्त करणे हा संशोधनातील पहिला टप्पा असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. संशोधनातील तांत्रिक गोष्टी जसे की विषयाची निवड, वैशिष्ट्ये, गृहीतके, विषयाचे महत्व याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कोणतेही संशोधन हे समाजाभिमुख असावे असे मत त्यांनी व्यक्त केले.
या एक दिवसीय कार्यशाळेसाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. जगन्नाथ साळवे, प्रा. डॉ. जया कदम, महाविद्यालयाचे आय. क्यु. ए. सी. समन्वयक आणि इंग्रजी विभागप्रमुख डॉ. संजू जाधव तसेच मराठी संशोधन केंद्र समन्वयक प्रा. डॉ. जया कदम, इतिहास संशोधन केंद्र समन्वयक डॉ.दत्तात्रेय डुबल, वाणिज्य संशोधन केंद्र समन्वयक डॉ. राहुल खरात आणि महाविद्यालयातील वरिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते. या कार्यशाळेमध्ये शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयातील इंग्रजी विभागातील सहाय्यक प्रा. संतोष शेळके यांनी केले आणि मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. जया कदम यांनी उपस्थितांचे आभार मानले.