Breaking News जिल्ह्यात १४ कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त
पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे ग्रामीण पोलीस आणि पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षक कार्यालयाद्वारे ऑक्टोबर २०२३ पर्यंत ४०९ प्रकारच्या कारवाईत ९ हजार ३५५ किलो ६८ ग्रॅम वजनाचे १४ कोटी ५५ लाख ३४ हजार २२३ रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून एकूण ५०४ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार अंमली पदार्थाच्या वापरावर आळा घालण्यासाठी तसेच अंमली पदार्थाबाबतची समस्या प्रभावीपणे हाताळण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी केंद्र समिती स्थापन करण्यात आली आहे.
या समितीमध्ये पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, उप वनसंरक्षक अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी शिक्षणाधिकारी (माध्यमिक), सहायक आयुक्त समाज कल्याण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,
सहा. केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाचे आयुक्त, उपविभागीय दंडाधिकारी, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त, केंद्रीय नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोचे अधीक्षक, पुणे व पिंपरी चिंचवड शहर प्रतिबंधक कक्षाचे अधिकारी असे एकूण १३ सदस्य आहेत. समितीची प्रत्येक महिन्याला जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येते.
जिल्ह्यातील अंमली पदार्थाचा वाढता वापर तसेच अंमली पदार्थाची समस्या सुलभरित्या हाताळून त्यावर प्रभावी कारवाई करण्याच्या दृष्टीकोनातून समिती कामकाज करत आहे. अंमली पदार्थांची होणारी बेकायदेशीर तस्करी, लागवड, वापर, विक्री, सेवन याबाबत पोलीस विभागाचे मदतीने मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येते.
वनविभाग तसेच कृषी परिसरात अंमली पदार्थाच्या वनस्पतींची बेकायदेशीर लागवड होवू नये याकरीता वनविभाग, कृषी विभाग, महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यवाही करून शेतकऱ्यांनी देखील प्रतिबंधीत अंमली पदार्थाच्या वनस्पतींची लागवड करू नये याबाबत जनजागृती करण्यात येते. शालेय शिक्षण विभाग, जिल्हा शल्यचिकीत्सकामार्फत शाळा, महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थाचे सेवनामुळे होणारे आरोग्याचे दुष्परिणाम, आर्थिक नुकसान याबाबत जनजागृती सुरू करणेत आली असून शाळा, महाविद्यालयात समन्वयक नेमण्यात आले आहेत.
जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जिल्ह्यात मॅरेथॉन, पथनाट्ये, रॅली, शाळा-महाविद्यालयात व्याख्याने, शिबीर आयोजित करण्यात आली होती. समाजकल्याण विभागाच्यावतीने व्यसन मुक्ती केंद्र व पुनवर्सन केंद्रांची वेळोवेळी तपासणी करण्यात येत असून त्यांना येणाऱ्या अडचणीबाबत सहकार्य करण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून औषध उत्पादित करणाऱ्या कंपन्यांची तपासणी करण्यात येत आहे.
*डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी-* अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडलेल्या नागरिकांना त्यातून बाहेर काढण्यासाठी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ सनियंत्रण केंद्र समिती काम करीत असून अंमली पदार्थाचे बेकायदेशीर तस्करी, विक्री, लागवडीबाबत माहिती मिळाल्यास नजीकच्या पोलीस ठाण्याला किंवा समिती सदस्य कार्यालयास माहिती द्यावी.