दावे व हरकती नोंदविण्याचे जिल्हा निवडणूक प्रशासनाचे आवाहन
प्रारूप मतदार यादी शुक्रवारी प्रसिद्ध होणार
पुणे, छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत २७ ऑक्टोबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून नागरिकांनी ९ डिसेंबरपर्यंत मतदार यादी संदर्भातील दावे व हरकती नोंदविण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित करण्यात आलेल्या छायाचित्र मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत २७ ऑक्टोबर रोजी प्रारुप यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या प्रारूप यादीवर संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे दावे व हरकती सादर करता येतील. प्राप्त दावे व हरकतीवर २६ डिसेबर २०२३ पर्यंत निर्णय घेण्यात येणार असून ५ जानेवारी २०२४ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर, मतदार नोंदणी अधिकारी तसेच मतदान केंद्राच्या सूचना फलकावर दावे व हरकतीची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीमधील मयत मतदार वगळून इतर मतदारांची नावे वगळण्यासाठी प्रस्तावित करण्यात आले आहेत. अशा मतदारांना वैयक्तिक लेखी सूचना दिल्यानंतर तसेच राजकीय पक्षांना दावे व हरकतीची यादी उपलब्ध करून दिल्यानंतर किमान सात दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यावर दावे व हरकतींवर निर्णय घेण्यात येणार आहे.
मतदार यादीमध्ये मतदार नोंदणीसाठी नुमना क्र ६ भरावे. त्यासोबत रहिवास पुरावा म्हणून वीज देयक, पाणीपट्टी, आधार कार्ड, बँक किंवा पोस्टाचे पासबुक, भारतीय पारपत्र, नोंदणीकृत विक्रीखत, नोंदणीकृत भाडेकराराची तसेच वयाचा पुरावा जन्म प्रमाणपत्र, आधारकार्ड, राज्यशिक्षण मंडळाने निर्गमित केलेले दहावी किंवा बारावी उत्तीर्ण झाल्याबाबतचे प्रमाणपत्र जोडावे.
मतदार यादीमधून नाव वगळण्यासाठी नमुना क्र. ७ भरावे. त्यासोबत नाव व्यक्तीचा मृत्यू दाखला, वीज देयक, पाणीपट्टी, आधार कार्ड बँक किंवा पोस्टाचे पासबुक, भारतीय पारपत्र, नोदणीकृत विक्रीखत, नोंदणीकृत भाडेकरार आदी कागदपत्रे जोडावीत.
मतदान यादीतील किंवा मतदान ओळ्खपत्रातील दुरुस्ती करण्यासाठी नमुना क्र. ८ भरावे. त्यासोबत पत्याचा पुरावा म्हणून वीज देयक, पाणीपट्टी, आधार कार्ड बँक किंवा पोस्टाचे पास बुक, भारतीय पारपत्र, नोंदणीकृत विक्रीखत, नोंदणीकृत भाडेकरार तसेच वयाचा पुरावा म्हणून जन्म प्रमाणपत्र, आधारकार्ड, राज्य शिक्षण मंडळाने निर्गमित केलेले दहावी किंवा बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र, पारपत्र आदी कागदपत्रे जोडावीत, अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी दिली आहे.