Type Here to Get Search Results !

जाणूनबुजून वार्षिक सर्वसाधारण सभेस वेठीस धरणाऱ्यांना सोमेश्वरचा खोटा कळवळा पुरुषोत्तम जगताप यांचे विरोधकांवर टिकास्त्र

जाणूनबुजून वार्षिक सर्वसाधारण सभेस वेठीस धरणाऱ्यांना सोमेश्वरचा खोटा कळवळा पुरुषोत्तम जगताप यांचे विरोधकांवर टिकास्त्र

सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. वर्षातून एकदाच सभासदांना सर्वांसमोर बोलण्याची संधी असताना फक्त वार्षिक सर्वसाधारण सभा विरोधकांनी जाणूनबुजून वेठीस धरली व पर्यायाने जे दुरदुरुन
सभासद आपले मत मांडण्यासाठी आले होते त्यांना आपली भूमिका न मांडताच यांच्या वेळकाढूपणामुळे व रटाळ निष्फळ चर्चेमुळे घरी परतावे लागले असा आरोप श्री सोमेश्वर
सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम जगताप यांनी केला. शेतकरी कृती समितीचे
सतीश काकडे यांच्या आरोपांवर  जगताप यांनी प्रसिद्धीपत्रक देत खुलासा केला आहे. जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे की, कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा दुपारी १ ते १० वाजेपर्यंत चालली मिटींगमध्ये सतीश काकडे, कांचन निगडे, ज्योतीराम जाधव, तानाजी (बाळासाहेब) गायकवाड, शंकर दडस, दिलीप गिरमे, नारायण भोसले या सहा सात लोकांनीच सभासद म्हणून पुर्णवेळ सुरुवातीच्या दोन विषयांवर
जादा वेळ घेतला. अखेर रटाळ व निष्फळ चर्चेला कंटाळून सभासदांनी पुढील विषय घेण्यासाठी आग्रह धरुन बहुमते सर्व विषयांना मंजूरी दिली आहे. जगताप पुढे म्हणाले की, अंदाजपत्रकात चालू वर्षाचा भाव प्रति मे.टन २९०० रुपये
धरला आहे असा आरोप विरोधक करतात. परंतू गतवर्षीच्या अंदाजपत्रकात प्रति मे.टन २९७५
रुपये दर धरलेला असताना देखील आपण प्रति मे. टन ३३५० रुपये ऊसाला भाव दिला.
कारखान्याच्या अंदाजपत्रकात साखर व उपपदार्थाच्या किंमती या कमीत कमी धरल्या जातात एवढी गोष्ट ही तज्ञ विरोधी नेत्यांच्या लक्षात येत नाही याचे आश्चर्य वाटते. श्री. जगताप पुढे
म्हणाले की, सध्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सभासद व बिगर सभासद असा एकूण १२ ते
१२.५ लाख मे.टन ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. आपला कारखाना प्रतिदिन ९००० मे. टनाच्या सरासरीने १५० दिवस चालवला तर १३.५ ते १४ लाख मे.टन ऊसाची आपणास गरज आहे. जास्त गाळप केले तर उत्पादन खर्च कमी होवून कारखान्याचा जास्तीचा फायदा होतो. ऊसाची टंचाई राज्यभर असल्याकारणाने गेटकेनचा ऊस सुरुवातीपासूनच सभासदांसोबतच आणला तरच तो जवळच्या अंतरामध्ये मिळू शकेल. अन्यथा ६० दिवसांनंतर गेटकेनचा ऊस आपल्याला मिळू शकणार नाही. तसेच कारखान्याच्या क्षमतेप्रमाणे गाळप केले तरच सभासदांना फायदा होणार आहे. त्यामुळे सभासदांबरोबरच आपल्याला गेटकेनचा ऊसही सुरुवातीपासून गाळपास आणावा लागेल. जगताप पुढे म्हणाले की, विरोधकांनी ऐच्छीक ठेवी जवळच्या लोकांच्याच परत करता यावेत यासाठी ठेव विमोचन निधी उभारला हा आरोप केला आहे. हा आरोप कोणताही अभ्यास न करता हवेत तिर मारण्याचे काम त्यांनी केले आहे. आपल्या कारखान्याकडे एकूण ४८ कोटी रुपयांच्या ठेवी पैकी १४.५ कोटींच्या ठेवी पुढील वर्षात मुदत संपल्यामुळे परत करावयाच्या आहेत. या ठेवीतील बऱ्यापैकी ठेवी या १२ टक्के व्याजदराच्या आहेत. त्या ठेवी परत करण्यासाठी त्याची तरतुद म्हणून १५ कोटी ठेव विमोचन निधीची आपण नियमानुसार
तरतुद केली आहे, ना ती जवळच्यांसाठी तरतुद आहे. राज्यात अनेक कारखान्यांनी वेगवेगळ्या
प्रकारचा निधी राखून ठेवलेला आहे. कारखाना कायमस्वरुपी आर्थिक दृष्ट्या सक्षम ठेवण्यासाठी अशा निर्धीींची तरतुद करणे जरुरीचे असते आणि यातूनच सभासदांना योग्य व जास्तीचा भाव देता येतो. ओढूनताणून चुकीच्या पद्धतीने भाव देणेचा प्रयत्न केला तर मागचेच दिवस पुढे येवू शकतात याचा सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे.
श्री. जगताप पुढे म्हणाले की, ३१/०३/२०२३ अखेर मध्यम मुदतीचे (एक्सपान्शन कर्ज, आत्मनिर्भर, सॉफ्ट लोन, कामगार वसाहत लोन कर्ज) असे सर्व मिळून ७७ कोटी ४० लाख कर्ज आहे. विस्तारीकरणाची कामे होत असताना ७५०० मे. टन क्षमतेचा कारखाना प्रतिदिन ९००० मे. टन प्रतिदिन गाळप क्षमतेने चालेन. तसेच को-जनरेशन प्रकल्प विस्तारीकरणामुळे ३६ मेगावॅट वीज निर्मिती होवून २५ मेगावॅट विजेची विक्री होईल. म्हणजे प्रतिदिन साधारणपणे ६ लाख विजेचे युनिट्स आपण निर्यात करणार आहोत. हे सर्व कर्ज होत असले तरी स्थावर
मालमत्ता उभारणीसाठी हे कर्ज होत आहे. याच्यातूनच गाळप क्षमत, वीज निर्मिती, अल्कोहोल
व इथेनॉल निर्मितीत मोठ्या प्रमाणात वाढ होवून यंत्रसामुग्रीची कार्यक्षमता वाढ होणार आहे. या
सर्व बाबीतून अधिकचे उत्पादन आपल्याला घेता येईल व यातून खर्चामध्ये बचत होवून
सभासदांना जास्तीचा मोबदला देणे शक्य होणार आहे असेही श्री. जगताप म्हणाले. ऊसाच्या
भावावर परिणाम न होता ही कर्ज फेड जादाच्या उत्पन्नातून होणार आहे ही विश्वास आम्हाला
आहे, सभासदांनी चिंता करु नये. व कार्यक्षेत्रातील सभासदांचे ऊस लागवडीखालील क्षेत्र व सभासदांनी धारण केलेले शेअर्स यामध्ये तफावत असलेमुळे दि. २९/९/२०२२ च्या मा. वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ऊस क्षेत्राच्या
प्रमाणात शेअर्स (भाग) घेणेबाबतचा विषय अजेंड्यावर घेणेत आलेला होता. त्यानुसार पूर्वीच्या
किमान १० गुंठे क्षेत्र धारण करणान्यास १ शेअर्स हे धोरण अबाधीत ठेवून गेल्या ३ गळीत हंगामामध्ये सभासदांनी लागवड केलेल्या ऊस क्षेत्राची माहिती घेणेत येवून प्रति एक एकर क्षेत्राकरीता १ शेअर्स या धोरणास सभासदांनी मान्यता दिली. त्यावेळी झालेल्या चर्चेस अनुसरून सभासदांनी पुर्वीचे प्रती सभासद दरमहा ५ किलो साखर वाटपाचे धोरणामध्ये बदल करुन प्रति शेअर्स प्रतिमहा ५ किलो याप्रमाणे नव्याने धोरण आखणेबाबत मागणी केली.सदरच्या मागणीनुसार पुर्वीच्या साखर वाटप धोरणामध्ये बदल करुन शेअर्सच्या प्रमाणात
दरमहा प्रति शेअर ५ किलो आणि दिपावलीकरीता प्रति सभासद १० किलो साखर देणेचा निर्णय झालेला आहे. पूर्वीचे साखर वाटप धोरण हे प्रति कार्ड प्रतिमहा ५ किलो आणि दिपावलीसाठी ३० किलो असे होते. नवीन धोरणानुसार सभासदांना आपण पुर्वीच्या साखर वाटप धोरणापेक्षा ५०६९ क्विंटल साखर जास्त देत आहोत याची नोंद सभासदांनी घ्यावी.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test