बारामती ! ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२३ च्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण.
निवडणूक प्रक्रिया सुरळितपणे पार पाडण्यासाठी समन्वयाने कामे करा- तहसीलदार गणेश शिंदे
बारामती : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२३ च्या पार्श्वभूमीवर तहसीलदार गणेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कवी मोरोपंत सभागृह येथे मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण संपन्न झाले.
तहसीलदार श्री. शिंदे म्हणाले, तालुक्यात ३२ पैकी ३१ ग्रामपंचायतीमधील एकूण १३५ मतदान केंद्रावर निवडणूका होणार आहेत. निवडणूक प्रक्रियेत आपली भूमिका लक्षात घेता याबाबत काटेकोरपणे नियोजन करावे. निवडणूक प्रक्रिया तणावमुक्त वातावरणात सुरळितपणे पार पाडण्यासाठी दिलेल्या जबाबदारीप्रमाणे सर्व संबंधितांनी समन्वयाने कामे करावीत, अशा सूचना श्री. शिंदे यांनी दिल्या.
यावेळी श्री. शिंदे यांनी मतदार यादी, मतपत्रिका, ईव्हीएम यंत्र, मतदान साहित्य ताब्यात घेतांना, मतदान केंद्र, कक्ष उभारणी करतांना घ्यावयाची काळजी, ईव्हीएम यंत्र हाताळतांना येणाऱ्या समस्या आणि त्याअनुषंगाने करावयाच्या उपाययोजना, अभिरुप मतदान ( मॉक पोल), मतदान पथकाची स्थापना व तालीम, मतदान केंद्र येथील बैठकव्यवस्था, स्वच्छता, कायदा सुव्यवस्था, मतदान प्रक्रियेविषयी गोपनियता, मतदारासांठी ओळखपत्र पुरावा आदीबाबत माहिती दिली. मतदान प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी, मतदान प्रक्रिया सुरु असतांना तसेच मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर करावयाची कार्यवाही याबाबत मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षण सत्रास निवासी नायब तहसीलदार विलास करे, नायब तहसीलदार तुषार गुंजवटे, मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी उपस्थित होते.