वंचित घटकातील नागरिकांच्या मतदार नोंदणीकरिता विशेष शिबिर
पुणे : मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात वंचित घटकातील नागरिकांच्या मतदार नोंदणीकरिता जिल्ह्यातील समाज कल्याण, महिला व बालविकास विभाग व जिल्हा एडस् प्रतिबंध व नियंत्रण विभाग यांनी विशेष शिबिरांचे आयोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
भारत निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत २७ ऑक्टोबर ते ९ डिसेंबर २०२३ या कालावधीत नागरिकांकडून दावे व हरकती म्हणजेच नागरिकांकडून मतदान नोंदणीचे, मतदार यादीतील नोंदीच्या दुरुस्ती वा वगळणीचे अर्ज मागविण्यात आले आहेत. मतदार नोंदणी कार्यक्रमात काही वंचित घटकातील मतदारांची नोंदणी कमी प्रमाणात होत असल्याने त्यांच्या मतदार नोंदणीसाठी प्रशासनातर्फे विशेष प्रयत्न करण्यात येत आहे.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार २ डिसेंबर (शनिवार) व ३ डिसेंबर (रविवार) या दिवशी तृतीय पंथीय व्यक्तीसाठी व महिला सेक्स वर्कर (एफएसडब्लू ) यांच्यासाठी जिल्ह्यातील अशासकिय संस्था यांच्याशी समन्वय साधून व त्यांचे सहकार्य घेऊन शिबिरे आयोजीत करण्यात यावीत. शिबिरात कमीतकमी १०० जणांची मतदार नोंदणी करून घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
तृतीयपंथीय मतदारांच्या नोंदणीसाठी तृतीयपंथीयांची अधिक वस्ती असणारी ठिकाणे ठरवावीत. महिला सेक्स वर्कर (एफएसडब्लू ) यांच्यासाठी शिबिरे आयोजित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य एड्स कंट्रोल सोसायटी (एमएससीएस), मुंबई जिल्हा एड्स कंट्रोल सोसायटी (एमडीएसीएस) च्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्यांचे सहकार्य घ्यावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी अधिकाऱ्यांना पत्राद्वारे दिले आहेत.