मानवीय भावनांचा साहित्यिक उत्सव
अंत से तह तक....
सुकून वरच्या तुळशी कट्ट्याचा अठरावा कार्यक्रम...
भाव भावना आणि त्यांची स्पंदनं... ही मनात कुठेतरी आत सलत असतात. यातूनच वाईट आणि चांगल्या विचारांचा एक कोलाज मनाच्या एका कोपर्यात तयार होत असतो. कदाचित म्हणून श्रावस्तीच्या जंगलातल्या लोकांना मारुन त्यांची बोटे तोडून गळ्यात हार करुन घालणारा डाकू अंगूलीमल देखील भगवान बुद्धांनी त्याच्या मनावर केलेल्या बौद्धीक संस्कारांनी भिक्षु बनला. तो भिक्षु बनला म्हणजे त्याला मोक्ष मिळाला असे नाही तर त्याच्या वाईट विचारांवर चांगल्या विचारांचा प्रभाव पडला.
या कथेचा सारासार विचार केल्यास गौतम बुद्धांनी अवलंबलेल्या विचारांचा, त्याला अनुसरुन दिल्या जाणार्या शिकवणीचा बारकाईने अभ्यास केल्यास, बुद्ध आणि मोक्ष या दोन्ही गोष्टी खूपच भिन्न आहेत याचं भान येतं. बुद्धीझम मध्ये मोक्ष येत नाही. याचा ठळकपणे विचार केल्यास एखाद्याचा अंत झाला तरी त्याचे विचार मरत नाहीत तर ते अगदी तळापर्यंत जातात, रुजतात आणि व्यक्तीबरोबर पुन्हा ते नवा जन्म घेतात. मानवीय भावनांचा हा खूप खोल गाभा विचारात घेवून लेखक दिग्दर्शक विपुल देशमुख यांनी आपला सारासार विवेकवाद पणाला लावून गुंफलेला एक आगळा एकपात्री हिंदी प्रयोग.. अंत से तह तक..... नुकताच पाहण्याचा योग आला. केवळ 45 मिनीटात मानवीय भावनिक अवस्थांचा उलगडलेला एक एक पदर एक नवा दष्टीकोन देवून जात होता. एका अंधार्या कोठडीत बंद केलेला सर्व मनुष्यजातीचं प्रतिनिधीत्व करणारा एक माणूस आणि त्याचा उपद्रवी, चंचल, पृथ्वीवरुन कधीही न संपणार्या उपद्रवी झुरळाशी सुरु असणारा संवाद यातून प्रयोगाला धार येते.
कोठडीत बंद करताना तो आतून सुटकेसाठी खूप धडपडत असतो. ओरडत असतो... पण त्याची हाक कुणापर्यंतही जात नसते. एकटा पडलेला तो आपली कर्मकहाणी त्याच कोठडीत पळणार्या एका झुरळाला सांगतो. झुरळाच्या पळापळीबरोबर त्याची नजर धावत असते, पण मनाच्या आत खोलात साठून राहिलेली सारी तगमग त्याच्याशी बोलून तो व्यक्त करत असतो. या संवादातून त्याच्या मनातील रितेपण समोर येतं. त्याची अस्वस्थता, भिरभिरणारी नजर, कोलमडून गेलेलं शहाणपण आणि आता हाती राहिलेली हतबलता... काळ्या पडद्यांनी अधिक गडदपणे समोर येते. माणूस मेला तरी विचार संपत नाहीत... या वाक्यातील वस्तुनिष्ठता अलगदपणे डोक्यात शिरते.
विचारांचा सामना विचारांनी करण्याचा एक नवा दृष्टीकोन हा प्रयोग देवून जातो. दिग्दर्शकाच्या कौशल्याला राजन जोंशी यांनी पुरेपूर न्याय दिला आहे. अस्खलित हिंदी पाठांतर, त्यातही झुरळाशी असणारा संवाद, उच्चारातील स्पष्टता, विचार करुन प्रत्येक शद्बांवर केली गेलेली मेहनत आजिबात सोपी नाही. मराठीतून विचार करण्याची पाचवीला पुजलेली सवय अशी एका प्रयोगासाठी सहज बाजूला सारणं हे नक्कीच सोपं नाही. त्यातून अभिनयाशी अखंडपणे जुळवून ठेवलेली नाळ... हिंदी भाषेचं आव्हान मनात, डोक्यात सतत असूनही कुठेही निसटल्यासारखी वाटली नाही. शिवाय पोएटिक फॉर्ममध्ये आशयाची केलेली बांधणी विशेष उल्लेखनीय वाटली. शांत पण मौनातून बरच काही सांगणारं नेपथ्य, आशयाचा बाज अधिक ठळकपणे समोर आणणारं संगीत यामुळे प्रयोगाला अधिक शोभा आली. मानवीय भावनांचा हा एक साहित्यिक उत्सव होता असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.
अश्विनी टेंबे, कोल्हापूर
---------------