नवीन आरोग्य केंद्र, उप जिल्हा रुग्णालयांना मंजुरीसह;श्रेणीवर्धन व पदभरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी- उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील बैठकीत वरुड, मोर्शी, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, तुमसर, पुसद, वसमत, गंगापूर,खुलताबाद, औंढा नागनाथ, अकोले, सुरगाणा आदी तालुक्यांचा आढावा
मुंबई :- राज्यातील वरुड, मोर्शी, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, तुमसर, पुसद, चंदगड, गडहिंग्लज, आजरा, वसमत, गंगापूर, खुलताबाद, औंढा नागनाथ, अकोले, संगमनेर, सुरगाणा, शिरूर, आंबेगाव, मंचर, बारामती, खेड, मोहोळ, अहमदनगर आदी तालुक्यातील नवीन प्राथमिक तसेच उप आरोग्य केंद्रे, उप जिल्हा रुग्णालयांना मंजूरी देण्याबरोबरच, रुग्णालयांचे श्रेणीवर्धन, पदभरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी. रुग्णालयांना वैद्यकीय चाचणी आणि अद्ययावत उपचारयंत्रणा उपलब्ध करावी. औषधांचा पुरवठा नियमित सुरु राहील, याची दक्षता घ्यावी. रुग्णांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची संबंधीत आरोग्य अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आरोग्य यंत्रणा प्राधान्याने सक्षम करण्यात येत आहे. कोविड संकटकाळात आरोग्य यंत्रणेचे महत्व आपल्याला समजले आहे. त्यामुळे आरोग्य सुविधांच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत उपस्थित लोकप्रतिनिधींना दिला.
उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत विविध कामांना वित्त विभागाची मान्यता व निधी उपलब्ध करण्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार सर्वश्री यशवंत माने, मनोहर चंद्रिकापुरे, राजू कारेमोरे हे प्रत्यक्ष तर सतीश चव्हाण, देवेंद्र भुयार, दिलीप मोहिते, डॉ. किरण लहामटे, नितीन पवार, राजेश पाटील, चंद्रकांत नवघरे हे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. यावेळी वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितीन करीर, आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशीष शर्मा, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, आरोग्य सेवा आयुक्त धीरजकुमार, तसेच संबंधित जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून नवीन उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालये सुरू करण्याची मागणी येत आहे. अस्तित्वात असलेल्या शासकीय रूग्णालयांमध्ये खाटांची संख्या वाढवून त्यांचे श्रेणीवर्धन करण्याची मागणीही होत आहे. या पार्श्वभूमीवर नवीन उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, रूग्णालय यांना मान्यता देणे, खाटांची संख्या वाढवून श्रेणीवर्धन करणे याबाबत सर्वंकष निकष ठरवण्यात यावेत. निकष ठरवताना २०२१ ची वाढीव लोकसंख्या आणि आरोग्य केंद्रांमधील अंतर लक्षात घेऊन आरोग्य विभागाचा बृहत आराखडा मंत्रिमंडळासमोर आणावा. या सुविधा देतांना आदिवासी भाग, आकांक्षित तालुक्यांचा प्राधान्याने विचार करावा. त्यांच्यासाठी वेगळे निकष ठरवावेत, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, रुग्णालयांच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्यापूर्वी पदनिर्मितीची प्रक्रिया सुरू करण्यात यावी. ज्याठिकाणी रूग्णालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे, अशा ठिकाणी फर्निचर देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी देण्यात येईल. त्यानुसार सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील. आरोग्य सेवा अत्यावश्यक सेवा असल्याने या विभागातील डॉक्टर, नर्सेस, अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त होण्यापूर्वी, त्यांच्या पदांसाठी किमान ३ महिने आधी भरती प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. लोकप्रतिनिधींची मागणी विचारात घेऊन आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रांची बांधकामे सध्याच्या निकषांच्या आधारे तातडीने पूर्ण करावीत. यासाठी १५व्या वित्त आयोगातील निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
शिरूर तालुक्यातील ग्रामीण रूग्णालय पाबळ, मलठण, आंबेगाव तालुक्यातील तळेघर ग्रामीण रुग्णालयास मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल. राजणी (ता. आंबेगाव), करंदी (ता. शिरूर) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केले जाईल. पिंपरखेडा, कारेगांव व पिंपळे खालसा (ता. शिरूर) येथे नवीन उपकेद्र मंजूर करण्यात येईल. मंचर उपजिल्हा रूग्णालयातील रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली. खेड येथे ट्रामा केअर युनिट निर्माण करणे, चाकण रूग्णालयाचे श्रेणीवर्धन करणे व डायलिसीस सेंटर सुरू करण्यासही मंजुरी देण्यात आली. निरावागज (ता. बारामती) व जेरवाडी (ता. खेड) येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्याबाबत बैठकीत निर्देश देण्यात आले.
मोहोळ (जि. सोलापूर) येथे उपजिल्हा रूग्णालय मंजूर करणे, अकोले तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र मंजुरी, बोटा (ता. संगमनेर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे व अकोले ग्रामीण रूग्णालयाचे श्रेणीवर्धन करणे, सुरगाना (जि. नाशिक) व पारनेर (जि. नगर) येथील ग्रामीण रूग्णालयाचे श्रेणीवर्धन, ढवळपुरी (ता. पारनेर) येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणे, गंगापूर (जि. औरंगाबाद) येथील ट्रॉमा केअर युनिटचे अपूर्ण बांधकाम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिले.
खुल्ताबाद (जि. औरंगाबाद), चंदगड (जि. कोल्हापूर), उपजिल्हा रूग्णालय मोर्शी व वरूड (जि. अमरावती) येथे नवीन ट्रॉमा केअर युनीट सुरू करणे, वसमत (जि. हिंगोली) येथील स्त्री रूग्णालयाचे श्रेणीवर्धन करणे, साळना (ता. औंढा नागनाथ) येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण करणे, बाभुळगांव (ता. वसमत) येथील आरोग्य केंद्राच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देणे, वरूड (जि. अमरावती) येथे १०० खाटांचे महिला व शिशु रूग्णालयास मान्यता देणे, टेंभूरखेडा (ता. वरूड), पिंपळखुटा व रिद्धपूर (ता. मोशी) येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करणे, खेड व लोणी (जि. अमरावती) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करणे, मोरगांव अर्जुनी व सडक अर्जुनी (जि. गोंदिया) ग्रामीण रूग्णालयाचे उपजिल्हा रूग्णालयात श्रेणीवर्धन करणे, तुमसर (जि. भंडारा) येथील उपजिल्हा रूग्णालयाचे व मोहाडी ग्रामीण रूग्णालयाचे उपजिल्हा रूग्णालयात श्रेणीवर्धन करणे, पुसद (जि. यवतमाळ) येथे नवीन स्त्री रूग्णालय मंजूर करणेबाबत कार्यवाही करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.