धक्कादायक प्रकार ! दारु पिऊन वारंवार त्रास देत मारहाण करणाऱ्या मुलाला संपवण्यासाठी आई-वडीलांनीच दिली लाखो रुपयांची सुपारी.
बारामती - तो दारु पिऊन वारंवार त्रास देत मारहाण करणाऱ्या मुलाचा आई-वडीलांनीच १ लाख ७५ हजार रुपयांची सुपारी देत खून केल्याचा असल्याचा प्रकार उघडकीस. मिळालेल्या माहितीनुसार सदर प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी आई-वडीलांसह अन्य तिघांना अटक केली आहे. या घटनेत सौरभ पोपट बाराते याचा खून झाला होता. पोपट भानुदास बाराते, मुक्ताबाई पोपट बाराते यांच्यासह बबलू तानाजी पवार रा. रावणगाव, ता. दौंड तसेच बाबासाहेब उर्फ भाऊ गजानन गाढवे व अक्षय चंद्रकांत पाडळे यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.
शिर्सूफळ गावच्या (ता .बारामती) हद्दीत २६ मे रोजी एका तरुणाचा निर्घृण खून झाल्याचे दिसून आले होते. त्याला येथील पाण्याच्या तलावात फेकून देण्यात आले होते. या प्रकरणी तालुका पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांना रावणगाव येथील एक कुटुंब गावातून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली होती. पोलिस पथकाने तेथे जात चौकशी केली असता गावातील पोपट बाराते हे मुलगी मुक्ताबाई व मुलगा सौरभ यांच्यासह गेल्या तीन महिन्यांपासून गावातून अचानक गायब असल्याचे समोर आले होते.
त्यानंतर १५ दिवसांनी पोपट व मुक्ताबाई हे पती-पत्नी राहते घरी आले. परंतु सौरभ त्यांच्यासोबत आला नव्हता. त्यानुसार दि. ३१ आॅगस्ट रोजी पोलिसांनी तेथे जात पोपट व मुक्ताबाई यांच्याकडे मुलासंबंधी चौकशी केली. यावेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोपट याने मला काही माहिती नसून पत्नीला विचारा असे सांगितले. तिच्याकडे चौकशी केली तर तिने मुलगी निलम खुरंगे (रा. खुरंगेवाडी, ता. कर्जत, जि. नगर) हिच्याकडे तो गेल्याचे सांगितले. पोलिसांनी थेट खुरंगेवाडी गाठत चौकशी केली. त्यावेळी तेथे तो नसल्याचे दिसून आले.
मुक्ताबाई हिच्याकडे सखोल चौकशी केली असता तिने मुलगा सौरभ हा दारु पिवून मला मारहाण करत होता, वडीलांना त्रास देत होता. त्यामुळे गावातीलच बबलू पवार याला त्याला मारण्यासाठी १ लाख ७५ हजाराची सुपारी दिल्याचे कबुल केले. बबलू याने त्याचे मित्र गाढवे व पाडळे यांच्यासह सौरभ याला ठार मारून त्याचे प्रेत शिर्सूफळच्या तलावात दगड बंधून टाकून दिले असल्याचे तपासात समोर आहे.
ही कामगिरी पोलिस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर अधिक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे, उपनिरीक्षक राजेश माळी, हवालदार सदाशिव बंडकर, संतोष मखरे, दत्तात्रय मदने, शशिकांत दळवी, महेश कळसाईत आदींनी केली.