नागरिकांनी लोकसेवा हक्क कायद्याचा वापर करून लाभ घ्यावा-आयुक्त दिलीप शिंदे
पुणे : शासनाच्या विविध विभाग व प्राधिकरणामार्फत दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या सेवा काही वेळा सामान्य माणसापर्यंत वेळेत पोहोचत नाहीत किंवा त्या सेवा प्राप्त करण्यासाठी नागरिकांना अनेकवेळा प्रयत्न करावे लागतात. अशा परिस्थितीत नागरिकांनी लोकसेवा हक्क कायद्याचा वापर करून लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त दिलीप शिंदे यांनी केले.
राज्य हक्क अधिनियम २०१५ मधील तरतूदी, कार्यपद्धती व अधिसूचित सेवा याबाबतची माहिती देण्यासाठी लोणी काळभोर येथील आयोजित ग्रामसभा बैठकीत आयुक्त श्री. शिंदे बोलत होते. यावेळी आयोगाच्या उप सचिव अनुराधा खानविलकर, हवेलीचे गट विकास अधिकारी भूषण जोशी, पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, हवेलीचे माजी उपसभापती योगेंद्र काळभोर, सरपंच योगेश काळभोर, उपसरपंच ललिता काळभोर आदी उपस्थित होते.
श्री. शिंदे म्हणाले, महाराष्ट्र शासनाने विविध विभागाच्या सेवा विहित मुदतीत मिळाव्यात यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ हा क्रांतीकारी कायदा अंमलात आणला आहे. नागरिकांना शासनाच्या अधिसुचित सेवा प्राप्त करुन घेण्याचा अधिकार देणारा व प्रशासनाला जबाबदार व उत्तरदायी बनविणारा हा कायदा आहे. या कायद्यामुळे नागरिकांना तत्परतेने, विहीत कालावधित सहज व सुलभपणे सेवा मिळणे शक्य होत आहे.
आतापर्यंत शासनाच्या विविध विभागांच्या ५०० हून अधिक सेवा या कायद्याअंतर्गत अधिसुचित करण्यात आल्या असून यापैकी सुमारे ४०० सेवा आपले सरकार पोर्टल तसेच आर. टी. एस. महाराष्ट्र या मोबाईल ॲपवर ऑनलाईन उपलब्ध आहेत. घरी बसुन नागरिक त्या सेवा प्राप्त करु शकतात. तसेच आपल्या गावातील आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन देखील या सेवांचा लाभ मिळू शकतो. या अधिसूचित सेवांची यादी प्रत्येक कार्यालयात दर्शनीभागी व संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अधिनियमामध्ये पद निर्देशित अधिकाऱ्याने पात्र व्यक्तींना कालबद्ध लोकसेवा देणे बंधनकारक असून सेवा देण्यासाठी निश्चित कालमर्यादा आहे. कालमर्यादेत माहिती देण्यास कसूर करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपयांपर्यंत दंड लावण्याची तसेच शिस्तभंगाची कारवाई करण्याची तरतूद आहे. 'आपली सेवा आमचे कर्तव्य' असे आयोगाचे ब्रिद वाक्य असून या कायद्यातील तरतूदींचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध माध्यमांतून लोकजागृती करावी, असे आवाहनही श्री. शिंदे यांनी केले.
श्री. जोशी म्हणाले, संत तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या मुक्कामाचे लोणी काळभोर हे ठिकाण असल्याने त्याला विशेष महत्व आहे. ५० हजार लोकसंख्या असलेले हे गाव नेहमी विविध कामात अग्रेसर असते. या ठिकाणी सर्व निर्णय एकमताने घेण्यात येत असून प्रशासनाला नेहमीच सहकार्य मिळत असते.
प्रास्ताविकात सरपंच श्री. काळभोर यांनी गावातील विविध प्रकारच्या प्रकल्पांची माहिती दिली. यावेळी उपस्थितांना पंचप्रण प्रतिज्ञा देण्यात आली. तसेच गावातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.