मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे पथक 'शासन आपल्या दारी' साठी जेजुरी येथे दाखल
पुणे - जेजुरी येथे सोमवार ७ ऑगस्ट रोजी आयोजित 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमाच्या जागेची मुख्यमंत्री जनकल्याण कक्षातर्फे पाहणी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत संबंधित विभागप्रमुखांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव व मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे राज्य मुख्य समन्वयक डॉ. अमोल शिंदे, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी व मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे सह राज्य मुख्य समन्वयक अमित हुक्केरीकर, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे व इतर अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
श्री.शिंदे यांनी कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन केले आणि सर्वांनी परस्पर सहकार्याने कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या ठिकाणी मुख्यमंत्री जनकल्याण कक्षातर्फे नागरिकांची निवेदने स्वीकारण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी, आरोग्य व स्वच्छता सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या