सोमेश्वरनगर ! कारगील विजय दिनानिमित्त सैनिकांच्या पत्नीने प्रकट केल्या आपल्या भावना.
सोमेश्वरनगर(मेघा गोलांडे)- बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनियर कॉलेज सी.बी.एस.ई वाघळवाडी येथे कारगील विजय दिवसाचे औचित्य साधून सोमेश्वर परिसरातील सैन्य दलात तैनात असलेले व तसेच काही वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांच्या पत्नींना बोलवण्यात आले होते. मुलांना सैनिकांच्या त्यागाबरोबर सैनिकांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींचा त्यागही समजावा हा यामागील उद्देश होता.
यावेळी प्रियांका तांबे यांनी घरातील कर्ता पुरुष सीमेवरती लढत असताना नातेवाईकांची होणारी मानसिक अवस्था व कुटुंब सांभाळताना स्त्रियांची होणारी तारेवरची कसरत सांगितली. तसेच ज्योती शिंदे यांनी कारगिल युद्धाची पार्श्वभूमी तसेच कारगिल युद्धाची रणनीती अगदी थोडक्यात व रंजक पद्धतीने सांगितली. यावेळी वीरपत्नी पुष्पलता पवार यादेखील उपस्थित होत्या. या कार्यक्रमांमध्ये शाळेतील स्वरांधरा संगीतमंचाने देशभक्तीपर गीते गाऊन आदरांजली वाहिली.
शाळेतील शिक्षिका सारिका काकडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.