फळपिक विमा योजनेंतर्गत सहभाग नोंदवण्यासाठी विमा पोर्टल सुरू
पुणे :- पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेंतर्गत मृग बहारातील अधिसूचित फळपिकांची विमा नोंदणी करण्यासाठी राष्ट्रीय पीक विमा पोर्टल http://pmfby.gov.in सुरु करण्यात आले असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे,असे आवाहन कृषि आयुक्तालयाचे मुख्य सांख्यिक डि. बी. पाटील यांनी केले आहे.
मृग बहारमध्ये संत्रा,मोसंबी, डाळिंब,चिकू, पेरु, लिंबू, सिताफळ व द्राक्ष (क) या ८ फळपिकांसाठी अधिसूचित करण्यात आलेल्या २६ जिल्ह्यांमध्ये हवामान धोक्यांच्या निकषानुसार फळपिक विमा योजना राबविण्यात येते. योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी ज्या बँकेमध्ये पिककर्ज खाते अथवा किसान क्रेडिट कार्ड खाते आहे तिथे अंतिम मुदतीच्या ७ दिवस अगोदर जमा करणे आवश्यक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनाही घोषणापत्र देणे आवश्यक राहील. जे कर्जदार शेतकरी विहित मुदतीत सहभागी होण्यासाठी बँकांना कळविणार नाहीत ते सहभागी आहेत असे गृहित धरण्यात येईल व या शेतकऱ्यांना विमा हप्ता विहित पद्धतीने कर्ज खात्यातून वजा करण्यात येईल.
सोलापूर जिल्ह्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि. (ग्राहक सेवा क्र. १८००१०२४०८८ , दूरध्वनी क्रमांक ०२२-६८६२३००, ईमेल आयडी rgicl.maharashtraagri@relianceada.com), सातारा एचडीएफसी अग्रो जनरल इन्शुरन्स कं.लि. (ग्राहक सेवा क्र. १८००२६६०७००, दूरध्वनी क्रमांक ०२२-६२३४६२३, ईमेल आयडी pmfby.maharashtra@hdfcegro.com) आणि पुणे जिल्ह्यासाठी भारतीय कृषि विमा कंपनी लिमिटेड, (ग्राहक सेवा क्र. १८००४१९५००४, दूरध्वनी क्रमांक ०२२-६१७१०९१, ईमेल आयडी-pikvima@aicofindia.com) या कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी मृग व आंबिया बहार मिळून जास्तीत जास्त ४ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा राहील. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. त्यापेक्षा कमी वयाच्या फळबागा लागवडीस विमा संरक्षणाची नोंद झाल्याचे पडताळणीत निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल.
शेतकऱ्यांनी अर्ज सादर करण्यासाठी फळपिकनिहाय अंतिम मुदत देण्यात आली आहे. संत्रा, द्राक्ष, पेरु व लिंबू या फळपिकासाठी १४ जून २०२३, मोसंबी, चिकूसाठी ३० जून, डाळिंबासाठी १४ जुलै व सिताफळासाठी ३१ जुलै २०२२ हा विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत राहील.
मृग बहारातील अधिसूचित फळपिकांचे हवामान धोके, विमा संरक्षित रक्कम, विमा संरक्षण कालावधी, विमा हप्ता याबाबतच्या सविस्तर माहितीसाठी दिनांक १८ जून २०२१ रोजीचा शासन निर्णय http://www.maharashtra.gov.in तसेच कृषि विभागाच्या http://www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित विमा कंपनीचे जिल्हा, तालुका कार्यालय अथवा कृषि विभागाच्या नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.