Type Here to Get Search Results !

निगडी येथे महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते अनावरणमहात्मा बसवेश्वरांनी १२ व्या शतकात संसंदीय लोकशाही प्रणालीचा पाया घातला- मुख्यमंत्री

निगडी येथे महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते अनावरण

महात्मा बसवेश्वरांनी १२ व्या शतकात संसंदीय लोकशाही प्रणालीचा पाया घातला- मुख्यमंत्री
पुणे : महात्मा बसवेश्वर यांनी १२ व्या शतकातच ‘अनुभवमंटप’ च्या  माध्यमातून संसदीय लोकशाही प्रणालीचा पाया घातला. जातीभेदाच्या भिंती तोडून टाकण्यासाठी त्यांनी स्वत:पासून सुरुवात केली, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले.

निगडी येथे उभारण्यात आलेल्या महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, महेश लांडगे, अश्विनी जगताप, अण्णा बनसोडे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह,पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त राहुल महिवाल, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, बसवेश्वरांनी समाजाप्रती आस्था, बांधिलकी दाखवून दिली. इंग्लंडमधील मॅग्नाकार्टा या संसदीय प्रणालीच्या आधीच त्यांनी ‘अनुभव मंटप’च्या माध्यमातून लोकशाही प्रणालीची व्यवस्था निर्माण केली. स्त्री-पुरुष, धर्म, जात- पात, पंथ भेदाच्या पलिकडे जाऊन कोणीही ‘अनुभवमंटप’ मध्ये आपले अनुभव मांडू शकत होते. श्रम हीच पूजा आणि श्रमाधारित व्यवस्था इतके साधे सोपे तत्त्वज्ञान महात्मा बसवेश्वरांनी सरळ सोप्या भाषेत मांडले. 

देवाशी म्हणजे शिवाशी जोडण्यासाठी मध्यस्थाची गरज नाही अशी मांडणी त्यांनी केली. त्यांच्या तत्वज्ञानाची जगभरातील विद्यापीठांनी दखल घेतली. महात्मा बसवेश्वर यांनी खऱ्या अर्थाने समता, बंधुता या तत्त्वांचा पुरस्कार केला.  महापुरुषांचे समाजासाठी योगदान मोठे आहे. त्यांच्या विचारांवर चालत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम आपण करत असतो. महात्मा बसवेश्वरांनी समता, बंधुतेच्या तत्त्वांसाठी कोणतीही तडजोड केली नाही. 

महात्मा बसवेश्वर यांचा  पुतळा हे प्रेरणास्थळ, उर्जास्थळ आहे. महात्मा बसवेश्वरांचा लंडन येथेही पुतळा उभारण्यात आला आहे. हे महापुरुष आपल्याला आदर्श देऊन गेले आहेत. निगडी येथील हा पुतळा लोकवर्गणी लोकसहभागातून केला याला जास्त महत्त्व आहे. त्यांचा त्याग, आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपण हे मोठे काम केले आहे, असे श्री.शिंदे म्हणाले. यापुढेही पुतळा परिसर सुशोभिकरण संबंधित आवश्यक कामासाठी पैसे कमी पडणार नाहीत. या परिसरातील दफन भूमीचा प्रश्नही सोडविण्यात येईल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचे ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्याचे वर्ष आहे. हीदेखील आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेऊन शासन काम करत आहे. गेल्या वर्षभरात राज्य शासनाने अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले. लोकांच्या जीवनामध्ये अनेक बदल घडविण्यासाठी अनेक नियम बदलले, असेही ते म्हणाले.

प्रास्ताविकात आयुक्त शेखर सिंह यांनी पुतळा उभारणीमागची संकल्पना स्पष्ट केली.  समतावादी मूल्ये रुजविण्यासाठी महात्मा बसेवश्वरांनी  उभे आयुष्य प्रयत्न केले. त्यांनी न्याय, बंधूता आणि एकतेची शिकवण दिली. समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांचे विचार मानवी जीवनाला प्रगत करणारे त्यांचे विचार होते.  महापुरुषांच्या अशा विचारांमुळे नव्या पिढीला दिशा मिळते असे त्यांनी सांगितले. 

यावेळी नारायणराव बहिरवडे यांनीही विचार व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने निगडी  प्राधिकरण येथे श्री महात्मा बसवेश्वर महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. सुमारे ३ हजार १५० चौरस मीटर क्षेत्र परिसरात पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. या पुतळ्यासमोरील जागेचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. पुतळ्याभोवती २२५ मीटर लांबीची सीमाभिंत बांधण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test