Type Here to Get Search Results !

पालखी सोहळ्यासाठीच्या आरोग्यसेवांचा आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी घेतला आढावा

पालखी सोहळ्यासाठीच्या आरोग्यसेवांचा आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी घेतला आढावा
पुणे  : आषाढी एकादशी निमित्ताने श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तसेच श्री संत तुकाराम महाराज पालखीसोबत इतर पालखी सोहळ्यासाठीच्या आरोग्यसेवांचा आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आलेल्या बैठकीत आढावा घेतला.

यावेळी अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार व राज्यातील आरोग्य विभागातील सर्व प्रमुख अधिकारी, विभागनिहाय व जिल्हानिहाय आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावर्षी पालखी प्रस्थान लवकर होणार असल्याने उन्हाळ्याचा त्रास होऊ शकतो. यासाठी पुरेसा ओआरएसचा साठा, औषधे, पिण्याच्या पाण्याचे अधिकाधिक टँकर, पाण्याच्या स्रोतांची, पाण्याची वेळोवेळी तपासणी करावी, रुग्णवाहिकांची संख्या वाढविणे, याचबरोबर आपत्कालीन स्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्व आरोग्य पथके, यंत्रणा सज्ज ठेवाव्यात याबाबतीत सूचना डॉ. सावंत यांनी दिल्या.

पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात औषधांची सुविधा करण्यात आली असल्याची  खात्री करावी. आपत्कालीन १०८ सेवेच्या आणि १०२ सेवेच्या अधिक रुग्णवाहिका नियुक्त करण्यात याव्यात, असेही त्यांनी सांगितले.

 दुचाकीवरुन सेवा देण्यासाठी आरोग्यदूत सुसज्ज ठेवण्यात येणार आहेत. बाह्यरुग्ण रुग्णवाहिका पथके, ग्रामीण रुग्णालयाची आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांची पालखी मुक्काम औषधोपचार केंद्रे, फिरते वैद्यकीय वैद्यकीय पथके अशी सर्व पथके आरोग्य सुविधांसाठी सज्ज करण्यात आली आहेत. अशी माहिती यावेळी उपस्थित  अधिकाऱ्यांनी दिली.

*मंत्री  डॉ. सावंत यांनी दिलेल्या सुचना :*
• आषाढी वारीनिमीत्त कृती आराखडा तयार करताना महाराष्ट्रातील सर्व दिंडीमार्ग विचारात घेण्यात यावेत.
• प्रत्येक दिंडीतील वारकऱ्यांची अंदाजे संख्या नियोजन करताना विचारात घ्यावी.
• दिंडी मार्गावर ठराविक अंतरावर पाच-दहा खाटांचे तात्पुरते दवाखाने कार्यान्वित करावे.
• दिंडी मार्गातील सर्व आरोग्य संस्था मनुष्यबळ व औषधीसह सुसज्ज ठेवण्यात यावी.
• दिंडीमध्ये वाढत जाणाऱ्या वारकऱ्यांच्या  संख्येनुसार आरोग्य सुविधा वाढविल्या जाव्यात. 
• आरोग्य व्यवस्थेतील सर्व जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांची नावे ठळकपणे प्रर्दशित केली जावी.
• सर्व रुग्णवाहिकांची तपासणी करुन औषधी व इतर उपकरणे असल्याची खात्री करावी.
• उष्माघात व इतर आजारांच्या बाबतीत आवश्यक दक्षता घेण्यात यावी.
• नियोजन करतांना दिंडीमार्गाचे लहान गटांमध्ये विभाजन करुन जबाबदार अधिकाऱ्यांची नेमणुक करावी. प्रत्येक गटात संपर्क यंत्रणा प्रभावीपणे राबविण्यात यावी.
• आवश्यक मनुष्यबळ राज्यातील इतर जिल्ह्यातून मागविण्यात यावे.
• आरोग्य विषयक सर्व कार्यक्रमांची माहिती दिंडी मार्गावरील प्रमुख गावामध्ये द्यावी.
• आषाढी पूर्वी दर आठवड्याला पूर्व तयारीचा आढावा घेण्यात यावा.
• दिंडी मार्गातील सर्व रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्र पातळीवर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे कामाचे वेळापत्रक तयार करावे.
• सर्व दिंडी मार्गावर कलापथक/समुपदेशक यांचा माध्यमातून आरोग्य विषयक प्रबोधन करण्यात यावे.
• दिंडी मार्गावरील सर्व जिल्ह्यात व आरोग्य संस्थात औषध व आवश्यक साहित्य सामुग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध करावी.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test