माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत पुणे जिल्ह्याची सर्वोत्तम कामगिरी
जिल्ह्यासह बारामती, लोणावळा आणि माळेगावचा होणार सन्मान
पुणे : राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या माझी वसुंधरा ३.० अंतर्गत भूमी, जल, वायु, आकाश आणि अग्नी या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्पर्धेत पुणे जिल्ह्याने सर्वोत्तम कामगिरी केली असून जागतिक पर्यावरण दिन ५ जून रोजी मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमात जिल्ह्यासह बारामती, लोणावळा आणि माळेगावचा सन्मान करण्यात येणार आहे.
पुणे जिल्ह्याने अभियानात चांगली कामगिरी केल्याने जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनाही या पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्यात येणार आहे. जिल्ह्याने गतवर्षीदेखील अभियानात चांगली कामगिरी केली होती. पंचतत्वावर आधारित सूक्ष्म नियोजन आणि नाविन्यपूर्ण संकल्पना राबवित अभियानातील यशाची परंपरा कायम ठेवल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात जिल्ह्याचा सन्मान होणार आहे.
बारामती आणि लोणावळा नगर परिषदांनी ५० हजार ते १ लक्ष लोकसंख्येच्या गटात सर्वोत्तम कामगिरी केली आहे, तर माळेगाव नगर पंचायतीने २५ हजार ते ५० हजार लोकसंख्येच्या गटात सर्वोत्तम कामगिरी केली आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरण संवर्धन, संरक्षण व जतन करण्यासाठी या दोन्ही शहरांनी वैशिष्ठ्यपूर्ण उपक्रम राबविले. त्याची नोंद वातावरणीय बदल विभाग आणि माझी वसुंधरा अभियान संचालनालयाने घेतली आहे.
जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी या यशाबद्दल बारामती, लोणवळा नगर परिषद आणि माळेगाव नगरपंचायतीसह जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अभिनंदन केले आहे. लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या एकत्रित प्रयत्नामुळे हे यश मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांसोबत नागरिकांची स्वच्छता आणि पर्यावरणाप्रती जागरुकता महत्वाची असल्याने त्यांनी नागरिकांचेही अभिनंदन करून भविष्यात अशीच उत्तम कामगिरी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
*जिल्ह्याची पंचतत्वावर आधारित उत्तम कामगिरी*
माझी वसुंधरा अभियान ३.० च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी भूमी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वावर आधारित विहित केलेल्या उद्दिष्टांची पूर्तता करणेसाठी प्रत्येक नगरपरिषद आणि नगरपंचयायांच्यासाठी दर पंधरवड्याचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले. पंचतत्वांवर आधारित प्रत्येक घटकांचे उद्दिष्ट साध्य करणेसाठी वेळोवेळी तज्ज्ञ व्यक्ती/ संस्था यांचे मार्गदर्शन जिल्हास्तरावरून उपलब्ध करून देण्यात आले. घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन याकरिता जागा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबवून जागेबाबतचा प्रश्न मार्गी लावण्यात आला.
भूमी घटकांतर्गत जिल्ह्यात १ लाख ५० हजारपेक्षा अधिक वृक्षलागवड केली असून जिवंत वृक्षांचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. तसेच जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रात एकूण २४ नवीन हरित क्षेत्रांची निर्मिती केली आहे. वायू घटकांतर्गत नागरपरिषदांनी इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी केली असून ५० पेक्षा जास्त चार्जिंग पॉईंट उभारले आहेत.
जल घटकांतर्गत प्रत्येक सार्वजनिक इमारतीस जलपुनर्भरण तसेच शहरातील जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणे हे उपक्रम हाती घेण्यात आले. अग्नी घटकांतर्गत शहरात १०० टक्के एलईडी दिव्यांचा वापर सुरू झाला असून सौर ऊर्जेवर आधारित पाणीपुरवठा योजना सुरू करण्याचे उपक्रम हाती घेतले आहेत. आकाश घटकांतर्गत अभियानाची व्यापक युवकांचा सहभाग नोंदविण्यात आलेला आहे. घनकचरा व्यवस्थापनाचे महत्व शालेय विद्यार्थ्यांना पटवून सांगणेकरिता प्रत्येक नगरपरिषद क्षेत्रांत प्रक्रिया केंद्रांवर सहलींचे आयोजन करण्यात आले.