Type Here to Get Search Results !

मॉडर्न महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटननव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उन्नत ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे-उपमुख्यमंत्री

मॉडर्न महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उन्नत ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे-उपमुख्यमंत्री
पुणे : कृत्रिम बुद्धीमत्तेने शिक्षणासह सर्व क्षेत्रात मोठी क्रांती केल्यामुळे होणाऱ्या बदलांना लक्षात घेऊन त्यासाठीचे मनुष्यबळ शिक्षणाच्या माध्यमातून निर्माण करावे लागेल. ‘लर्न, अनलर्न, रिलर्न’ अशी त्रिसूत्री स्वीकारल्याशिवाय भविष्यातील आव्हानांचा सामना करता येणार नाही. त्यामुळे नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उन्नत ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आणि भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर सभागृहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे, माधुरी मिसाळ, माजी खासदार अमर साबळे, अपर पोलीस महासंचालक व राज्याचे कारागृह व सुधार सेवा महानिरीक्षक अमिताभ गुप्ता, पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, सचिव शामकांत देशमुख, सहकार्यवाह सुरेश तोडकर, जोत्स्ना एकबोटे आदी उपस्थित होते. 

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, शिक्षणाच्या क्षेत्रात येत्या काळात झपाट्याने बदल होणार आहेत. २१ व्या शतकात नव्या पिढीसमोर कालसुसंगत राहण्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे. तंत्रज्ञानात वेगाने बदल होत असल्याने सातत्याने नव्या आव्हानांचा अभ्यास करून त्यानुसार शिक्षणाच्या क्षेत्रात कालानुरूप बदल करावे लागतील, अन्यथा शिक्षण पद्धत कालबाह्य व निरुपयोगी ठरेल.

नव्या शैक्षणिक धोरणात भविष्याचा विचार
भविष्यातील आव्हाने ओळखूनच देशात नवीन शिक्षण धोरण तयार करण्यात आले आहे. ते विस्तार, सर्वसमावेशक आणि उत्तमता या त्रिसुत्रीवर आधारीत असून त्यासोबत रोजगारक्षमता हा मुद्दा त्यात समाविष्ट आहे. इच्छा असणाऱ्याला शिक्षण देण्यासाठी विस्तार महत्वाचा आहे. उच्च शिक्षण घेण्याच्या वयातले २३ टक्के शिक्षण घेतात, हे प्रमाण ५० टक्क्यापर्यंत घेवून जायचे आहेत. विद्यार्थी दुप्पट करताना मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधा उभारून संपूर्ण व्यवस्था तयार करावी लागेल. हे मोठे आव्हान आहे.

*प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी दीपस्तंभासारखे काम करणारी संस्था*
 ज्ञान असणाऱ्याला शिक्षण मिळणे तेवढेच गरजेचे आहे. रोजगाराचे प्रश्न समोर उभे असताना शैक्षणिक गुणवत्ता आणि रोजगारक्षमता महत्वाची आहे. हे करण्यासाठी महाविद्यालयांचे ॲक्रीडीटेशन आणि अभ्यासक्रमासाठी स्वायत्तता यात समन्वय साधून शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा घडवून आणता येईल. विद्यापीठांनी महाविद्यालयातील शिक्षणातील उत्तमतेकडे लक्ष देण्याची गरज आहे. नव्या काळातील शैक्षणिक गरजा लक्षात घेणाऱ्या प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीने शिक्षणाच्या क्षेत्रात अमिट ठसा उमटवला आहे. नव्या काळातील प्रवाह लक्षात घेऊन पुढे जाणारी ही संस्था देशाच्या संक्रमणाच्या अवस्थेमध्ये दीपस्तंभासारखे काम करणारी संस्था आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी काढले.

खाजगी विद्यापीठांना अभ्यासक्रमाबाबत स्वायत्तता-चंद्रकांतदादा पाटील
पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, प्रोग्रेसिव्ह संस्थेने नेहमीच उत्तमतेवर भर दिला आहे. मॉडर्न महाविद्यालयातील शिक्षणात नवीन शैक्षणिक धोरणानुसार भविष्याचा वेध आणि भूतकाळाबाबत गौरवाची भावना अशा दोन्ही बाबींचा समावेश आहे. राज्यात १ हजार ५०० महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे. 

ते पुढे म्हणाले, भविष्याचा वेध घेवून कौशल्य विकास, मातृभाषेतून शिक्षण, आपल्या थोर परंपरेची जाणीव आणि मूल्यशिक्षण अशा चार पैलूंचा समावेश नव्या शैक्षणिक धोरणात आहे. खाजगी विद्यापीठ आणि महाविद्यालयांना नवे अभ्यासक्रम सुरू करण्यातील अडथळे लवकरच दूर करण्यात येतील. खासगी विद्यापीठात १० टक्के गरीब विद्यार्थ्यांचे शुल्कही माफ केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

आमदार शिरोळे म्हणाले, मॉडर्न महाविद्यालयाने शिक्षण क्षेत्रातील प्रगतीसोबत सामाजिक जाणिवेने काम केले आहे. शिक्षण क्षेत्रात संवेदनशिलतेने काम करणारे प्राध्यापक असल्याने राष्ट्रनिर्माणाचे कार्य या माध्यमातून घडत आहे. 

यावेळी डॉ.एकबोटे यांनी विचार व्यक्त केले. शिक्षण क्षेत्रात नाविन्याकडे कल वाढत असताना त्यासाठी आवश्यक सुविधा देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. मूल्यशिक्षणासोबत अत्याधुनिक अभ्यासक्रमाचे शिक्षण दिले जात असल्याने विविध क्षेत्रात मॉडर्न महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपला ठसा उमटवला आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात श्रीमती एकबोटे यांनी नूतन इमारतीविषयी माहिती दिली.

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते डॉ.गजानन एकबोटे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे सदस्य, प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test