बारामती ! ‘हुमणी नियंत्रण’ विषयी शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे मळद येथे आयोजन
बारामती - कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यावतीने मळद येथील ग्रामपंचायत सभागृहात ‘ऊस पिकामधील हुमणी किड नियंत्रण व तंत्रज्ञान’ या विषयावरील शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन आयोजन करण्यात आले.
प्रशिक्षणास आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विश्वजीत मगर, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक गणेश जाधव, राष्ट्रीय अजैविक ताण संशोधन संस्थेचे डॉ. अर्जुन तायडे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉक्टर धीरज शिंदे, विशेषज्ञ संतोष करंजे, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी सुरेश काळे, एकता शेतकरी समूहाचे अध्यक्ष नितीन शेंडे, शेतकरी बचत गटाचे सदस्य, ऊस लागवड करणारे प्रगतशील शेतकरी आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. तायडे यांनी ऊस पिकातील लागवड तंत्रज्ञान त्याचबरोबर ताण व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. श्री. शिंदे यांनी ऊस पिकातील हुमणी नियंत्रणाबाबत हुमणी किडीचे जीवन चक्र, उत्पत्ती व सध्याच्या पावसामुळे परिसरामध्ये दिसणारे हुमणीचे भुंगेरे नष्ट करावयाची पद्धत स्पष्ट केली. छोटा खड्डा खणून त्यामध्ये प्लास्टिकचे अच्छादन करून त्या खड्ड्यात पाणी व ऑइल मिसळून त्यावर प्रकाश सापळ्याचा वापर करून कमी खर्चात हुमणीचे नियंत्रण करता येईल याविषयी मार्गदर्शन केले.
श्री. करंजे यांनी खरीप हंगामामध्ये ऊस पिकात आंतरपीक म्हणून सोयाबीन व उडीद या पिकाचा समावेश करून नत्र स्थिरीकरण त्याचबरोबर शेतकऱ्यांना या आंतरपिकाच्या माध्यमातून आर्थिक लाभ कशा पद्धतीने होईल याविषयी मार्गदर्शन केले.
श्री. काळे यांनी ऊस लागवड करताना घ्यावयाची काळजी, रोपांमध्ये ठेवावयाचे अंतर, बीज प्रक्रिया आणि त्यासाठी आवष्यक निविष्ठा आदी माहिती दिली.