बारामतीत ‘शासन आपल्या दारी’ महाशिबिरात साडेआठ हजार नागरिकांना लाभ
बारामती दि. ३० : उप विभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय व अन्य सर्व शासकीय कार्यालयांच्या संयुक्त विद्यमाने जिजाऊ मंगल कार्यालयात ‘शासन आपल्या दारी' अभियानाअंतर्गत आयोजित महाशिबिरात ८ हजार ४७३ नागरिकांना शासनाच्या विविध सेवा व योजनांचा लाभ देण्यात आला. तालुक्यातील मंडल कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातही ‘शासन आपल्या दारी' अभियानाचे आयोजन करून लाभार्थ्यांना विविध योजना व सेवांचा लाभ गतीने आणि विहित कालमर्यादेत पुरवावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी यावेळी केले.
कार्यक्रमास तहसिलदार गणेश शिंदे, परिविक्षाधीन तहसिलदार नेहा शिंदे, सहायक गट विकास अधिकारी नंदन जरांडे, तालुका कृषि अधिकारी सुप्रिया बांदल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते.
यावेळी श्री. नावडकर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून नागरिकांना विविध विभागातील योजनांचे लाभ एकाच छताखाली मिळावेत यासाठी 'शासन आपल्या दारी' अभियान राबविण्यात येत आहे. नागरिकांना बऱ्याच योजनांची माहिती नसते. या शिबिराच्या माध्यमातून अशा योजना नागरिकांपर्यंत पोहोचवाव्यात. सर्व विभागांनी पुढील १५ दिवसात तालुक्यातील वेगवेगळ्या मंडळ स्तरावर 'शासन आपल्या दारी' उपक्रमाचे आयोजन करून तळागाळातील लोकांपर्यंत योजनांची माहिती उपलब्ध करून द्यावी आणि योजनांचे अर्ज भरून घ्यावे.
विद्यार्थांसाठी शाळेत शिबिराचे आयोजन करून विविध दाखले वितरीत करण्यात यावेत. सर्वच विभागांनी अभियानांतर्गत चांगले काम करून शासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्न करावे. शिबिरातील विविध दालनांना भेट देऊन नागरिकांनी माहिती घ्यावी आणि मंडळ कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
तहसिलदार गणेश शिंदे यांनी प्रास्ताविकात अभियानाची माहिती दिली. ते म्हणाले, शासनातर्फे नागरिकांना विविध सेवा पुरविल्या जातात. परंतु नागरिक सेवाबद्दल अनभिज्ञ असतात. या माध्यमातून एकच छताखाली नागरिकांना विविध योजनांचा लाभ आणि माहिती मिळू शकेल. नागरिकांना कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार नाहीत.
*अभियानांतर्गत विविध सेवांचा नागरिकांना लाभ*
अभियानात कृषि विभागाच्या २ हजार ७०९ आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांनांतर्गत ४ लाभार्थ्यांना कर्ज वाटप अशा एकूण २ हजार ७१३ लाभार्थ्यांना १ कोटी ७ लाख ६४ हजार २०० रूपये अनुदान मंजूर करण्यात आले. बारामती तालुक्यातील ५ हजार ७६० लाभार्थ्यांना विविध सेवा, योजनांचे लाभ मंजूर करण्यात आले. त्यामध्ये सामाजिक वनीकरण विभागाचे १९, संजय गांधी निराधार योजना अनुदान पत्र ४५, श्रावणबाळ योजना ७, उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे नूतनीकरण आणि शिकाऊ परवाना ५०, भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणीचे नकाशे ६१, नगरपरिषद मार्फत विविध दाखले ६६, शिधापत्रिका १००, महसूल दाखले ४ हजार ९५०, ४२ डी सनद ५, रोजगार हमी योजनेअंतर्गत ४२, पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती १५१, आरोग्य विभा मातृत्व वंदना योजना १०, जननी सुरक्षा योजना ४, घरकुल योजना १२, आणि महावितरण नवीन विद्युत जोडणी आणि नावबदल २३८ अशा सेवा आणि योजनांचा समावेश आहे.
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात काही लाभार्थ्यांना विविध सेवांचे प्रमाणपत्र, लाभ, दाखले वाटप करण्यात आले. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीच्या ३ हजार ५०० लाभार्थ्यांचे बँक खाते आधारशी संलग्न करण्यात आले.
या प्रसंगी तहसिल कार्यालय, बारामती नगरपरिषद, सामाजिक वनीकरण विभाग, पंचायत समिती, कृषि विभाग, उप प्रादेशिक परिवहन विभाग, उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय इत्यादी विभागांचे स्टॉल्स लावण्यात आले होते.