शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विनामूल्य बाह्यरुग्ण विभाग सुरू
बारामती : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, बारामती येथे मेंदू, मणका व कर्करोग संबंधित तक्रारी असलेल्या व आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील रुग्णांवर विनामूल्य उपचारांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्या हस्ते बाह्यरुग्ण विभाग आजपासून सुरू करण्यात आला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, बारामती येथे प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी सकाळी १० ते १ पर्यंत मेंदू, मणका व कर्करोगासंबंधित तक्रारी असतील अशा रुग्णांकरिता विनामूल्य बाह्यरुग्ण विभाग सुरु राहणार असून पुणे येथील प्रसिध्द न्युरोसर्जन डॉ. संजय व्होरा व कर्करोग तज्ञ डॉ. चकोर व्होरा यांनी या विनामूल्य उपचारांसाठी तयारी दर्शविली आहे, अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता, डॉ. म्हस्के यांनी दिली.
पहिल्याच दिवशी बारामती शहरासह ग्रामीण भागांतील सुमारे २०० रुग्णांनी या सेवेचा फायदा घेतला.
बाह्यरुग्ण विभागाच्या उद्घाटन प्रसंगी उप अधिष्ठाता डॉ. अंजली शेटे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. अमोल शिंदे, डॉ. सर्फराज पठाण, प्रशासकीय अधिकारी नंदकुमार कोकरे, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, मिलींद संगई, अधिसेविका श्रीमती बिराजदार, सहयोगी प्राध्यापक, शल्यचिकित्साशास्त्र चिकित्सालयीन विभागाचे विभागप्रमुख आदी उपस्थित होते.