अभिमानास्पद ! मु. सा. काकडे महाविद्यालयास'नॅक' कडून 'अ' दर्जा प्रदान
सोमेश्वरनगर: बारामती तालुक्यातील मु. सा. काकडे महाविद्यालयास नुकतेच केंद्र सरकारची उच्चशिक्षण क्षेत्राचा दर्जा प्रदान करणारी स्वायत्त संस्था नॅक बेंगलोरच्या समितीने भेट दिली. दिनांक १७ व १८ एप्रिल २०२३ रोजी ही भेट देण्यात आली होती व त्या समितीने महाविद्यालयास 'अ' श्रेणी प्रदान केली. ही गोष्ट महाविद्यालयाच्या इतिहासात प्रथमच घडली असून मु. सा. काकडे महाविद्यालयाच्या शिरपेचात
मानाचा तुरा रोवणारी ही बाब आहे अशी प्रतिक्रिया महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष . सतीशराव काकडे यांनी दिली तसेच भविष्यात सर्वांचे असेच सहकार्य असावे जेणेकरून महाविद्यालय अधिक उंचीवर पोहचेल अशी अपेक्षा
त्यांनी व्यक्त केली. यापूर्वी २००४ मध्ये सर्वात प्रथम नॅकने महाविद्यालयास भेट दिली होती. त्यावेळी महाविद्यालयाला 'B' श्रेणी प्राप्त झाली होती. त्यानंतर २०१२ साली नॅक समितीने भेट देऊन 'B+' ही श्रेणी प्रदान केली होती. तसेच २०१७ साली
तिसऱ्या वेळी बेंगलोर येथील नॅक समितीने महाविद्यालयास 'B++' ही श्रेणी प्रदान केली. यावेळी चौथ्यांदा महाविद्यालय नॅकला सामोरे गेले. यावेळी महाविद्यालयास नॅकची 'A' श्रेणी प्राप्त होऊन महाविद्यालयाने यशाचे उंच शिखर गाठून आपला शैक्षणिक दर्जा उत्तरोत्तर वाढवून परिसरात आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
परिक्षेत्रात महाविद्यालयाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. याबाबत परिसरातील नागरिक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,
पंचक्रोशीतील पालक वर्ग व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य यांच्यामध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाविद्यालयात सध्या बी.ए.,बी. कॉम., बी.एस्सी., बीबीए (सीए) एम.ए., एम. कॉम आणि एम.एस्सी. या पारंपारिक अभ्यासक्रमांसोबत इतिहास, मराठी व वाणिज्य विषयातील तीन पीएच. डी. संशोधन केंद्रे चालवली जातात. तसेच नवीन शैक्षणिक धोरणानुसार
महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारच्या नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या संस्थेच्या मान्यतेचे कौशल्याधिष्ठित १३ विविध शॉर्ट टर्म कोर्सेस यशस्वीरित्या चालवले जातात व विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी या कोर्सेसच्या
माध्यमातून प्रयत्न केले जातात. चौथ्यांदा महाविद्यालय नॅकला सामोरे जात असताना विविध पातळीवर सक्षमरित्या तयारी करून नॅकची 'A' श्रेणी प्राप्त केली आहे. ही बाब महाविद्यालयाच्या शैक्षणिक विकासाच्या वाटचालीत महत्त्वपूर्ण
ठरली आहे अशी प्रतिक्रिया महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष. अभिजीतभैय्या काकडे यांनी दिली. मु. सा. काकडे महाविद्यालय हे परिसरातील
सर्व घटकातील गोरगरीब, वंचित, शेतकरी, शेतमजूर या विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे करणारे आपले महाविद्यालय म्हणून ओळखले जाते. या
महाविद्यालयात गरीब विद्यार्थी निधीतून विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत देऊन पारधी समाजातील (अनुसूचित जमाती) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गेली अनेक वर्षे मोफत शिक्षण दिले जाते. नुकतेच महाविद्यालयाने सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे केले आहे. या पन्नास वर्षाच्या कार्यकाळात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, पत्रकारिता
आणि औद्योगिक क्षेत्रात अनेक विद्यार्थी यशस्वीपणे कार्यरत आहेत. २०१४ साली महाविद्यालयाने बाबालाल काकडे विज्ञान इमारत स्वभांडवलातून उभारली. २०१८ साली पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील उत्कृष्ठ महाविद्यालय म्हणून या महाविद्यालयास राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान
या केंद्र व राज्य सरकारच्या संस्थेकडून दोन कोटी रुपये अनुदान प्राप्त झाले होते. त्या तून महाविद्यालयाने संभाजीराव काकडे कौशल्य विकास केंद्र ही भव्य इमारत उभी करून विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले. या इमारतीसाठी महाविद्यालयाने सुमारे ९७ लाख रुपये स्व-भांडवल खर्च करून आणि सरकारचे दोन कोटी रुपये खर्च करून महाविद्यालय परिसरात भव्य इमारत,शैक्षणिक सुविधा व इतर उपकरणे खरेदी करून महाविद्यालयातील अध्ययन
आणि अध्यापन प्रक्रिया अधिक प्रभावी करून शैक्षणिक गुणवत्ता दर्जेदार केली आहे. महाविद्यालय परिसरात महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व प्रसिद्ध उद्योजक आर. एन. (बापू) शिंदे यांनी महाविद्यालयातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यास
दोन कोटी रुपये खर्च करून प्रशस्त व अद्ययावत सुविधांयुक्त सभागृह स्वखर्चाने बांधून देऊन महाविद्यालयाच्या विकासात महत्त्वाचे व मोठे योगदान दिले आहे. या चौथ्यांदा सामोरे गेलेल्या मूल्यांकन प्रक्रियेमध्ये महाविद्यालय माजी विद्यार्थी
संघटनेचे व पालकांचे महत्त्वपूर्ण योगदान ठरले. महाविद्यालयातील व्यवस्थापन समितीने कायम महाविद्यालयाच्या विकासाला व दर्जाला महत्व दिल्यामुळे महाविद्यालय हे यश प्राप्त करू शकले. या सर्व प्रक्रियेत महाविद्यालयातील व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची दूरदृष्टी व योगदान महत्त्वपूर्ण होते. व्यवस्थापन समितीचे ज्येष्ठ संचालक . प्रमोदकाका काकडे यांचे मोलाचे सहकार्य
महाविद्यालयास लाभले. महाविद्यालयाने अनेक आघाडीवर यश प्राप्त करताना केलेल्या विविध विकास कामांतून प्राप्त केलेली दर्जेदार प्रतिमा महत्त्वपूर्ण आहे.महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. सतीशराव काकडे देशमुख
यांच्या प्रयत्नातून व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे यांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील राज्यसभा सदस्य व्ही. मुरलीधरन यांच्या खासदार फंडातून प्राप्त झालेल्या १५ लाख रुपये निधीतून ग्राउंडवर प्रशस्त ओपन जिम बांधण्यात आली आहे. त्याचा उपयोग विद्यार्थ्याबरोबरच परिसरातील नागरिक करीत आहेत. नुकतेच सोमेश्वर परिसरातील सुमारे ३० विद्यार्थी पोलीस भरती प्रक्रियेत यशस्वी झाले आहेत. त्यांनाही क्रीडा सुविधा व ग्राउंड उपलब्ध
करून देऊन महाविद्यालयाने त्यांना करिअरची संधी उपलब्ध करून दिली आहे.बेंगलोर येथील राष्ट्रीय मूल्यांकन व प्रमाणिकरण परिषद (नॅक) या स्वायत्त संस्थेने सात निकषांवर आधारित संस्थेचे मुल्यांकन करून श्रेणी प्रदान केली. अभ्यासक्रम
घटक, अध्यापन, अध्ययन व मूल्यमापन, संशोधन व विस्तार उपक्रम, भौतिक सुविधा व अध्ययन स्त्रोत, विद्यार्थी सक्षमीकरण व वृद्धीकरण, प्रशासन व नेतृत्व, संस्था मुल्ये व बेस्ट प्रॅक्टिसेस या सात निकषांवर आधारित महाविद्यालाचे
शैक्षणिक वर्ष २०१७-१८ ते २०२१-२२ या पाच वर्षातील शैक्षणिक घटकातील विविध उपक्रमांच्या आधारावर कर्नाटक, पश्चिम बंगाल व गोवा या तीन राज्यातून आलेल्या तज्ज्ञांच्या तीन सदस्यीय समितीने दिनांक १७ व १८ एप्रिल २०२३ रोजी
महाविद्यालयात भेट देऊन व तपासणी करून अहवाल 'नॅक' या संस्थेला सादर केला होता. एकूण १००० गुणांपैकी ६५० गुणांचे मूल्यांकन ऑनलाईन पद्धतीने तर ३५० गुणांचे मूल्यांकन ऑफलाइन पद्धतीने करण्यात आले. या सर्व विभागातील मूल्यांकन करून सोमवार दि १ मे २०२३ रोजी नॅक बेंगलोर येथील स्वायत्त संस्थेकडून महाविद्यालयास ३.२४ CGPA सह 'A' श्रेणी देऊन प्रमाणिकरण करण्यात आले.या नॅक राष्ट्रीय मूल्यांकन प्रामाणिकरण परिषद, बेंगलोरच्या मूल्यांकन
प्रक्रियेत महाविद्यालयातील सर्व घटकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले अशी प्रतिक्रिया प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी दिली. या संपूर्ण नॅक प्रक्रियेचे काम आयक्यूएसी समन्वयक व इंग्रजी विभागाचे विभागप्रमुख डॉ. संजू जाधव यांनी
पाहिले.