बारामती ! सांगवी येथे स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत फळे व भाजीपाला प्रक्रिया बाजार व संपर्क वाढ उप प्रकल्पाचे उद्घाटन
बारामती : महाराष्ट्र शासन कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा पुणे अंतर्गत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून राबवण्यात येत असलेल्या बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत ( स्मार्ट) नाथसन् फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीच्या फळे व भाजीपाला प्रक्रिया बाजार व संपर्क वाढ उप प्रकल्पाचे सांगवी येथे स्मार्टचे जिल्हा नोडल अधिकारी अंकुश बरडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाला तालुका कृषि अधिकारी सुप्रिया बांदल, मंडळ कृषि अधिकारी चंद्रकांत मासाळ, आत्माचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक गणेश जाधव, शेतकरी उत्पादक कंपनीचे चेअरमन नितीन तावरे, प्रतिभा शेतकरी उत्पादक कंपनीचे चेअरमन अशोक तावरे, सांगवी गावचे कृषि सहाय्यक ऋषिकेश कदम, कंपनीचे सर्व संचालक मंडळ सभासद आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. बरडे म्हणाले, प्रकल्पाच्या माध्यमातून शेतमालाच्या मूल्य साखळीतील अडचणी सोडविण्यासाठी कंपनीच्या सभासदानी एकत्र येऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उत्पादित शेतमालाची मूल्य साखळी विकसित करण्यासाठी सर्वांनी एकमेकांना पूरक अशी व्यवस्था निर्माण करणे अपेक्षित आहे. सर्व घटकांना एका मंचावर आणून अशी पूरक व्यवस्था निर्माण करणे म्हणजेच मूल्य साखळी विकसित करणे होय.
मूल्य साखळी विकासासाठी स्वतंत्र असा कार्यक्रम अथवा असा प्रकल्प उपलब्ध नसल्याने स्मार्ट प्रकल्पाची संकल्पना पुढे आली. शेतकऱ्यांनी त्यांच्या भागात पिकणाऱ्या फळे व भाजीपाला पिकांची प्रक्रिया करणारी प्रणाली याच भागात निर्माण केल्याने तेथील पिकांना योग्य अशी बाजारपेठ व बाजारभाव त्याच गावात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अधिकचा नफा शेतकऱ्यांना मिळू शकतो या प्रकल्पामधून शेतकऱ्यांची फार मोठी अडचण सुटणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
श्रीमती बांदल यांनी शेतकऱ्यांनी शेतमाल उत्पादनाबरोबरच शेत मालावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन करण्याबाबतचे मार्गदर्शन केले.
उद्घाटन करण्यात आलेल्या फळे व भाजीपाला प्रक्रिया बाजार व संपर्क वाढ उप प्रकल्पाचे मूल्य ३ कोटी रुपये असून प्रकल्पाला शासनाच्यावतीने जवळपास ६० टक्के अनुदान देय आहे.