बारामती ! ‘शासन आपल्या दारी’ अभियानाअंतर्गत शिबिरात जास्तीत जास्त लाभार्थ्यांना योजनांचा लाभ द्यावा-वैभव नावडकर
बारामती : 'शासन आपल्या दारी' अभियानाअंतर्गत ३० मे रोजी बारामती शहरात शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरात सर्वच विभागांनी शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ देण्यात द्यावा, अशा सूचना उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिल्या.
उपविभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित ‘शासन आपल्या दारी’ अभियानाची पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी तहसिलदार गणेश शिंदे, तालुका कृषि अधिकारी सुप्रिया बांदल, पशुधन विकास अधिकारी डॉ. आर. आर.पाटील, निवासी नायब तहसिलदार विलास करे आदी उपस्थित होते.
श्री. नावडकर म्हणाले, शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी चांगल्याप्रकारे तयारी करावी. एकूण किती लाभार्थ्यांना लाभ देण्यात येत आहे त्याची निवड यादी सर्व विभागांनी आजच तहसिल कार्यालयात सादर करावी. शिबिरात लाभार्थ्यांकडून योजनांचे अर्ज भरून घेतले जावेत, विविध प्रकारचे अर्जांचे नमुने उपलब्ध केले जावेत. विविध योजनांची माहिती असणारे स्टॉल्स प्रत्येक विभागाने लावावेत त्यादृष्टीने प्रत्येक विभागांनी तयारी करावी. कोणीही लाभार्थी योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची सर्वच विभागांनी दक्षता घ्यावी, अशाही सूचना त्यांनी दिल्या.
'शासन आपल्या दारी' या अभियानाअंतर्गत शिबिरात नागरिकांनी, लाभार्थ्यांनी सहभाग घेवून विविध योजनांचा लाभ आणि माहिती घ्यावी, असे आवाहनही श्री. नावडकर यांनी यावेळी केले.