पर्यावरण पूरक जीवन पद्धती अभियानाअंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न
बारामती: कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) पुणे व कृषि विज्ञान केंद्र बारामती यांच्या संयुक्त विद्यमानाने कृषि विज्ञान केंद्र बारामती येथे संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेच्या अनुषंगाने पर्यावरण पूरक जीवन पद्धती अभियानाअंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाला आत्माचे प्रकल्प संचालक विजय हिरेमठ, तालुका कृषि अधिकारी सुप्रिया बांदल, इंदापूर, मावळ, वेल्हा, पुरंदर, दौंड, भोर येथील तालुका कृषि अधिकारी, कृषि विज्ञान केंद्र बारामतीचे प्रमुख डॉ.धीरज शिंदे, विषय विशेषज्ञ संतोष गोडसे, व्यवस्थापक महेश जाधव, मंडळ कृषि अधिकारी, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विश्वजीत मगर, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक गणेश जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक श्री. हिरेमठ यांनी बदलत्या जीवनशैली नुसार आणि बदलत्या नैसर्गिक परिस्थितीला अनुसरून पीक पद्धतीत कशा पद्धतीने बदल घडवून आणावा याची माहिती देवून निसर्गाचा समतोल योग्य राहण्यासाठी पीक पद्धतीत आवश्यक बदलाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.
डॉ.धीरज शिंदे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्राची ओळख तसेच राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयी मार्गदर्शन केले.
विषय विशेषज्ञ यशवंत जगदाळे यांनी बदलत्या हवामानानुसार व नैसर्गिक परिस्थितीनुसार फळबागांची लागवड पद्धत व सीआरए तंत्रज्ञानबद्दल माहिती दिली.
व्यवस्थापक महेश जाधव यांनी बदलत्या जीवनशैलीनुसार आहारात देखील बदल करणे तितकेच गरजेचे आहे असे सांगून पौष्टिक तृणधान्यांचे मानवी आरोग्यासाठीचे फायदे व लागवड तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले.