Type Here to Get Search Results !

पुणे जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न

पुणे जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न

पुणे, : आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना बि-बियाणे, खते, किटकनाशकांच्या पुरेशा उपब्धतेवर लक्ष द्यावे; बोगस बियाणे, खते, बोगस किटकनाशके बाजारात येऊ नये यासाठी अशा प्रकरणात तातडीने गुन्हे दाखल करत कठोर कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

विधानभवन येथे आयोजित जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते.  यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार भीमराव तापकीर, संजय जगताप,  जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, विभागीय कृषि सहसंचालक रफिक नायकवडी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संजय काचोळे, आत्माचे प्रकल्प संचालक विजय हिरेमठ, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी अनिल देशमुख आदी उपस्थित होते.

अल निनोचा परिणाम पाहता खरीप हंगामात दुबार पेरणीची गरज भासल्यास बियाणे उपलब्धता राखीव ठेवावी असे सांगून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, बियाणे, किटकनाशांच्या बाबतीत जिथे तक्रार येईल तिथे लगेच तपासणी, अहवाल करत गुन्हे दाखल करावेत. अशा प्रकरणात कठोर शिक्षा होईल यावर लक्ष द्यावे.

शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज आहे. ऊस उत्पादकांना सूक्ष्म सिंचन संच बंधनकारक करण्यासाठी प्रयत्न करावेत. विविध कार्यकारी संस्थांना फवारणीसाठी अनुदानावर ड्रोन यंत्रे देता येतील. तेथून मागणीप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतावर फवारणी होऊ शकेल. शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होण्याच्यादृष्टीने राज्याच्या महत्त्वाकांक्षी अशा सौरकृषि वाहिनी योजनेला गती द्यावी. या योजनेचे महत्त्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करा, असेही श्री. पाटील म्हणाले.

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पडीक जमिनीवर बांबू लागवडीचा उपक्रम चांगला असून त्याची जास्तीत जास्त प्रसिद्धीद्वारे शेतकऱ्यांना महत्व पटवून द्या, असेही पालकमंत्री म्हणाले.

यावेळी कृषिपंप वीजजोडणी, जिल्ह्यातील धरणप्रकल्पातील पाणीपरिस्थितीचाही आढावा घेण्यात आला.  मार्च २०२३  अखेर कृषिपंपांच्या वीजजोडण्या प्राधान्याने पूर्ण करण्यात आल्या असून यावर्षात जिल्ह्यात १० हजार वीजजोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यानुसार वीजजोडासाठी अनामत रक्कम भरलेल्या शेतकऱ्यांना तीन महिन्याच्या आता वीजजोडणी द्यावी, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी प्रास्ताविकात सांगितले, मान्सूनवर परिणाम करु शकणाऱ्या अल निनो घटकाचा विचार करता जिल्ह्यात बियाणे आणि खतांची पुरेशी उपलब्धता करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात खरीपाचे क्षेत्र सुमारे २ लाख हेक्टर आहे. गेल्या तीन हंगामात सुमारे २८ हजार क्विंटल बियाण्यांची विक्री झाली असून यावर्षी ३३ हजार क्विंटलच्या मागणीनुसार पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

गेल्या खरीप हंगामात २ लाख २१ हजार मे. टन रासायनिक खतांचा वापर झाला असून यावर्षीही आवंटनानुसार खताचा पुरवठा होत आहे. युरियाची होणारी मागणी पाहता शासनाने जिल्हा प्रशासनाच्या मागणीनुसार ४ हजार २०० मे. टन खतांचा बफर साठा करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार युरियाचा ३ हजार २०० मे. टन आणि डी.ए.पी. चा १ हजार मे. टनचा बफर साठा करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. 

पीक कर्ज वाटपाचेही जिल्ह्यात चांगले नियोजन करण्यात आले असून गेली दोन वर्षे उच्चांकी आणि त्यातही गतवर्षी उच्चांकी ४ हजार १६०कोटी रुपये पीक कर्ज वाटप झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांच्या कर्जमंजुरी रकमेत पुणे जिल्हा देशात दुसऱ्या स्थानावर आहे. ऊसाचे पाचट न जाळता कुजविण्यासाठी पाचट व्यवस्थापनाला प्रोत्साहन देण्यात येत असून दीड लाख हेक्टर पैकी ४८ हजार हेक्टरवरील सुमारे ३ लाख ५० हजार मे. टन पाचट कुजविण्यात यश मिळविले आहे.

यावर्षी बाजरीची उत्पादकता वाढविण्यावर भर देण्याचे नियोजन केले आहे. तसेच पावसाला विलंब झाल्यास भात पिके करपून जाण्याचा अनुभव लक्षात घेता भाताच्या रोपवाटिकांना प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) देण्यात येणार आहेत. अंजीराला भौगोलिक ओळख (जीआय) मानांकन मिळाले. त्याप्रमाणे आता जुन्नर परिसरातील शिवनेरी हापूसची जीआय मानांकन प्रक्रिया करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी दिला असून मानांकनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. 

अवेळी पाऊस आणि अन्य कारणामुळे मार्चअखेर झालेल्या नुकसानीचे पैसे वितरीत करण्यात आले असून यापुढे नुकसानभरपाईची रक्कम थेट डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. काचोळे यांनी सादरीकरण केले. बी- बियाणे, रासायनिक खतांची मागणी, उपलब्धता, निविष्टा गुणवत्ता नियंत्रण, कृषि यांत्रिकीकरण, फळबाग लागवड, राष्ट्रीय कृषि सिंचन योजना, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना आदींची माहिती दिली. 

श्री. हिरेमठ यांनी आत्मा यंत्रणेकडून राबविण्यात येणाऱ्या शेतीशाळा, सेंद्रीय शेती प्रकल्पाबाबत  सादरीकरण केले.

प्रारंभी पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते २०२३-२४ साठी कृषि यांत्रिकीकरण अंतर्गत डीबीटीद्वारे अनुदान प्राप्त लाभार्थी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. तसेच राज्यस्तरीय खरीप हंगाम २०२२ च्या पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. आत्मा यंत्रणेमार्फत तयार करण्यात आलेल्या विविध घडीपत्रिकांचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test