राष्ट्रीय कृषि विकास योजनेतून २४ शेतकऱ्यांना नवीन विहीर
अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय कृषि विकास योजनेतून २०२२-२३ या वर्षी पुणे जिल्ह्यातील २४ लाभार्थ्यांना नवीन विहीर योजनेचा लाभ देण्यात आला असून ५० लाख ४७ हजार रुपये अनुदान देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाने दिली आहे.
या योजनेंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील पात्र शेतकऱ्यांना नवीन विहीर खोदाईसाठी २ लाख ५० हजार रुपये इतक्या मर्यादेत अनुदान देण्यात येते. जिल्ह्यात अनुसूचित जमातीच्या २४ लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत अनुदान देण्यात आले आहे.
*लाभार्थी निवडीचे निकष*
योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अनुसूचीत जाती किंवा अनुसूचित जमाती संवर्गातील असावा. जातीबाबतचे प्राधिकृत अधिकाऱ्याचे जाती, जमाती प्रमाणपत्र आवश्यक आहे. शेतकऱ्याच्या नावे किमान ०.२० हेक्टर व कमाल ६ हेक्टर मर्यादेत जमीन असावी. शेतकऱ्याचे सर्व मार्गानी मिळणारे वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
अर्जदार शेतकऱ्याचे बँक खाते आधार कार्ड संलग्न असणे आवश्यक आहे. प्रस्तावित विहीर पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहिरीपासून ५०० फूटापेक्षा जास्त अंतरावर असल्याचा दाखला तसेच भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला आवश्यक आहे, अस जिल्हा परिषदेच्या कृषि विकास अधिकाऱ्यांनी कळविले आहे.