नीरा डावा कालव्याची दुरुस्ती युद्ध पातळीवर करण्यात येईल-कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर
नीरा डावा कालवा सिंचन प्रकल्पाची व्याप्ती खुप मोठी असून या बारमाही कालव्यावर पिण्याच्या पाण्याच्या योजना असल्याने त्याची दुरुस्ती करताना अडचणी येतात. येत्या १० ते १२ दिवसात युद्धपातळीवर हानी झालेल्या मोरीच्या भागाची दुरुस्ती करुन कालवा सिंचनास पूर्ववत करण्यात येईल. या भागातील लाभधारकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर यांनी केले आहे.
नीरा डाव्या कालव्यावर एकंदरीत ८५ वितरीका आहेत. हा कालवा वीर धरणापासुन रस्ता, नाला व ओढे छेदून पुरंदर, बारामती व इंदापूर तालुक्यातून गेला आहे. त्यामुळे या कालव्यावर १८ जलसेतू, ९० मोऱ्या, ४१ पुल, ९ सायफन अशी प्रमुख बांधकामे असून ती सर्व कमानीच्या दगडी बांधकामात केलेली आहेत. नीरा डावा कालव्याचे बांधकाम १८८२ ते १८८९ या कालावधीमध्ये झालेले आहे. नीरा डावा कालवा बारमाही असून कालव्यावरील पारेषाण व जलनि:सारणाची (सी.डी. वर्क्स) बांधकामे बांधून १३८ वर्षे पूर्ण झाली आहेत.
पाऊस, ऊन व वारा या निसर्गचक्रामुळे कालव्याच्या बांधकामाची व भरावाची झीज होऊन ते काळानुसार जीर्ण झाले आहे. कालव्यावरील बांधकामांचे आयुष्यमान तांत्रिकदृष्ट्या संपलेले आहे. ही बांधकामे जीर्ण झाल्याने त्यांची अचानक पडझड होते. सिंचन व्यवस्थापन सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी धरण व कालव्याची दैनंदिन निगराणी करणे, देखभाल करणे आणि वेळेवर त्यांची आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी गरज असते.
कालव्याच्या बांधकामाची दुरुस्ती, भराव्याची दुरुस्ती आणि गाळ काढण्याची कामे कालवा सुरु असताना करण्यात अडचणी येतात. त्यासाठी कालवा बंद करावा लागतो. परंतु नीरा डावा कालवा बारमाही असून कालव्यावर पिण्याच्या पाण्याच्या योजना अवलंबून असल्याने कालवा बंद करता येत नाही. त्यामुळे कालवा दुरुस्ती करत असतांना त्यामध्ये अडचणी येतात परिणामी कालव्याची दुरुस्ती वेळेवर होऊ शकत नाही.
नीरा डावा कालव्याचे उन्हाळ हंगामातील आवर्तन क्र.१ हे १ मार्चपासून सलग करण्यात आलेले आहे. कालव्याच्या पुच्छभागाकडील सिंचन सुरु असतांना कालव्याच्या सा.क्र.१०७/०८० येथील सणसर गावाच्या रायते मळा जवळील मोरी क्र.५९ ला १३ मार्च २०२३ रोजी अचानक भगदाड पडल्याचे निदर्शनास आले. या मोरीपासून वितरीका क्र. ३९ ते ५९ वरील पिकांना रब्बी हंगामात पाणी देऊन ४० दिवस लोटले होते. या वितरींकावरील १४ हजार १९७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे पाण्याअभावी नुकसान होऊ नये म्हणून ढासळलेल्या मोरीचा भाग ५ दिवसात युद्धपातळीवर दुरुस्त करुन कालवा सिंचनासाठी पुर्ववत करण्यात आला होता.
मागील १५ दिवसात पुच्छ भागातील वितरीका क्र. ५७ व ५९ वरील सिंचन पूर्ण करण्यात आले. मात्र ७ एप्रिल २०२३ रोजी सकाळी मोरी क्र.५९ मधून पुन्हा गळती सुरु झाल्याचे निदर्शनास आले. सदर गळती मागील काम केलेच्या ठिकाणी नसून त्याच्या बाजुचे बांधकाम ढासळुन होत आहे. या मोरीची संपूर्ण दुरुस्ती करावयास सुमारे २ महिने कालावधी आवश्यक आहे. दुरुस्तीसाठी इतक्या दिवस कालवा बंद ठेवल्यास पाण्याअभावि पिके जळुन जातील, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होईल. त्यामुळे येत्या १० ते १२ दिवसात युद्धपातळीवर हाणी झालेल्या मोरीच्या भागाची दुरुस्ती करुन कालवा सिंचनास पुर्ववत करण्यात येईल.
या भागातील लाभधारकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. मोरी क्र. ५९ ची दुरुस्ती पुरेसा कालावधी उपलब्ध न झाल्याने संपुर्ण मोरी दुरुस्त करणे शक्य नव्हते. यामध्ये कोणत्याही क्षेत्रीय कर्मचाऱ्याचा दोष नाही. तरी लाभधारकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन कार्यकारी अभियंता श्री. धोडपकर यांनी केले आहे.