आदर्श बहिणीसाठी पत्र लिहीत "महिला दिना" च्या शुभेच्छा...!
..ती मेणबत्ती प्रमाणे जळून दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश टाकणारी अशी ...ताई
महिला दिन विशेष लेख...८ मार्च हा दिवस आपण महिला दिन म्हणून साजरा करतो. त्यानिमित्त मला आमच्याच घरात असलेली एक कर्तृत्ववान स्त्री म्हणजे माझी बहीण ....प्रमिला गोलांडे हिच्याबद्दल सांगाव तितकच कमी कारण. आम्ही सहा बहिण भावंडात सगळ्यात मोठी असलेली आमची बहीण प्रमिला.आम्ही तिला प्रेमाने सर्वजण ताई असे म्हणतो. नावाप्रमाणेच ती सर्वांवर प्रेम करणारी आणि माया करणारी आहे. ती मोठी बहीण नव्हे तर आमच्या सर्वांची आईच आहे. जेव्हापासून आम्हाला समजायला लागले कळायला लागले तेव्हापासून आम्ही तिला केवळ कष्ट आणि कष्ट करतानाच पाहिले. तिने स्वतःच्या सुखाचा कधीही विचार केला नाही केवळ भावंडांचं सुख आधी पाहिलं.
आम्हा सर्व भावंडांना आमच्या बहिणीचा खूप अभिमान आहे. तिने उपसलेल्या कष्टांमुळेच आज आम्ही सर्व बहिण भावंड आनंदात आणि सुखात राहत आहोत. तिने स्वतःचा कधीही विचार केला नाही केवळ आपल्या लहान भावंडांचं सुख पाहिलं. तिने आम्हाला कधीही काही कमी पडू दिले नाही व सर्व भावंडांना कष्ट करण्याची सवय लावली. लबाडी करून चार पैसे जास्त कमाने पेक्षा कष्ट करून दोन घास कमी खाल्लेले कधीही चांगले असे शिकवण तिने आम्हाला दिली. सर्व भावांना शिकून सोडून तिने मोठे केले तिच्या कष्टामुळेच एक जण भाऊ इंजिनियर एक भाऊ प्रोफेसर असे नावारूपास आले. आपल्या पाठच्या दोन्ही बहिणींची लग्न तिने स्वतःहून लावून दिली.. माझ्या बहिणीबद्दल मी किती सांगू तेवढे कमीच आहे इतके तिने कष्ट आपल्या आयुष्यात भोगले आहेत. सर्वांच्या जोडीत सुख टाकणाऱ्या माझ्या या बहिणीच्या आयुष्यात मात्र स्वतःचे वैयक्तिक असे सुख कधी आलेच नाही.. स्वतः मेणबत्ती प्रमाणे जळून दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश टाकणारी अशी ही आमची बहीण.
सर्वात मोठी असल्याने आई-वडिलांनी तिचं लग्न लावून दिलं. परंतु तिच्या आयुष्यात मात्र वैवाहिक सुख कधीच नव्हतं. लग्नानंतर काही काळातच तिला आपल्या माहेरी परत यावे लागले आणि ते कायमचेच. आई-वडिलांची परिस्थिती अत्यंत हालकीच्या असल्यामुळे त्यांच्यावर स्वतःचे वजन पडता ती स्वतःहून बाहेर पडली आणि कष्ट करू लागली. मिळेल ते काम वाटेल ते कष्ट उपसून तिने आपल्या भावांना स्वतःच्या पंखाखाली घेतले. आपलं उरलेलं आयुष्य तिने भावांच्या व बहिणींच्या चांगल्या आयुष्यासाठी मार्गी लावलं. त्याकाळी ती सातवी पास झालेली होती.नोकरीच्या अनेक संदेश येऊ नये केवळ घरच्यांच्या विरोधामुळे तिला नोकरी करता आली नाही. अखेर तिने भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला. हळूहळू त्या व्यवसायात तिचा जम बसू लागला व त्यातून येणाऱ्या पैशातून तिने आपल्या उरलेल्या बहिणी भावांचे लग्न लावून दिली प्रत्येकाच्या संसारात कमी पडणाऱ्या गरजा तिने स्वतः पूर्ण केल्या.. सर्व बहिण भावंडांचे संसार उभे केले. सर्वांना काम धंदा व्यवसायाला मदत केली... आज आम्ही सर्व बहिण भाऊ सुखात आहोत ते केवळ तिच्यामुळेच तिने आम्हा सर्वांवर केलेल्या उपकारामुळेच..
आज वयाची सत्तरी ओलांडली तरी तिचे कष्ट कधीही थांबले नाहीत केवळ कष्ट आणि कष्टच ती करत आहे.. ते म्हणतात ना कष्ट करणाऱ्या माणसाला घरी बसवत नाही त्या उक्तीप्रमाणेच माझी ही मोठी बहीण अजूनही पुण्यात जाते व भाजी विक्रीचा व्यवसाय करते.
अशा माझ्या कर्तृत्ववान बहिणीचा मला खूप अभिमान आहे व आज महिला दिनानिमित्त मी तिला सलाम करू इच्छितो व महिला दिनाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो.. तिला दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..
धन्यवाद
आपल्या लाडक्या मोठ्या बहिणीसाठी लिहिणारा तिचा धाकटा भाऊ संजय मुरलीधर गोलांडे