दौंड ! “दौंड शुगरची” १४ व्या गळीत हंगामाची सांगता
आलेगांव (ता. दौंड) : दौंड शुगर कारखान्याचा १४ तवा गळीत हंगाम सन २०२२-२३ ची सांगता नुकतीच झाली असून कारखान्याने १०,०३,२८६.०४९ मे. टन ऊस गाळप केले असून १०,१५,८४३ क्विंटल साखर पोती उत्पादित होऊन आज अखेर सरासरी साखर उतारा १०.१६ टक्के राहिला आहे. कारखान्याची साखर निर्मितीची प्रक्रिया दोन दिवस चालू राहणार असून बी. हेवी व सिरप प्रक्रियेवर आधारित अंतिम साखर उतारा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक यांचेकडून प्रमाणित करुन व साखर आयुक्त कार्यालयाची मान्यता घेऊन लवकरच जाहीर करण्यात येईल असे कारखान्याचे संचालक विरधवल जगदाळे यांनी नमूद केले.
कारखान्याने मागील हंगामात १२,३७,४६० मे. टन ऊस गाळप करुन १२.५० टक्के साखर उतारा मिळविलेला होता. सदर हंगामातील अंतिम ऊस दर रुपये २,९२५/- प्रति मे.टन प्रमाणे शेतकन्यांना अदा करुन जिल्ह्यात उच्चांकी दर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. चालू हंगामात अति पर्जन्यमानामुळे ऊस उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली असल्याचे आढळून येत आहे. कारखान्याने चालू हंगामातील ऊस गाळपा करिता २८ फेब्रुवारी २०२३ अखेर प्रथम हप्त्यापोटी रु. २,३६० /- प्रति मे.टन प्रमाणे एकुण रु. २१६१९.६८ लाख रक्कम शेतकऱ्यांना अदा केलेली असून अंतिम साखर उताऱ्याच्या आधारावर एफ.आर.पी. नुसार ऊस दर जाहीर करण्यात येऊन त्याप्रमाणे उर्वरित ऊस बिल रक्कम अदा करण्यात येईल. कारखान्याची प्रगतीकडे चालू असलेली ही यशस्वी वाटचाल ऊस पुरवठादार शेतकरी ऊस तोडणी वाहतूकदार, कर्मचारी इ. यांच्या भक्कम विश्वासावरच यापुढील काळातही अशीच सुरु राहील व यातील प्रत्येक घटकाचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचविण्याच्या दृष्टीने "दौंड शुगर नेहमीच प्रयत्नशील राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.
कारखान्यामार्फत ऊस उत्पादन वाढविणेसाठी विविध योजना राबविणेत येत असून ठिबक सिंचन, कंपोस्ट खत वाटप, माती पाणी परीक्षण इत्यादी सुविधांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आपले दर एकरी ऊस उत्पादन वाढविणेसाठी प्रयत्न करणेचे आवाहन पुर्णवेळ संचालक शहाजीराव गायकवाड यांनी केले. याप्रसंगी कारखान्याचे अधिकारी प्रद्युम्न जोशी, शशिकांत गिरमकर, दिपक वाघ, चंद्रकांत सुद्रिक, आबासाहेब सुरवसे, संदेश बेनके व कर्मचारी उपस्थित होते.