पुणे जिल्ह्यातील प्रलंबित रस्त्यांची कामे त्वरीत करावीत- सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे निर्देश
मुंबई : पुणे जिल्ह्यातील हायब्रीड अॅन्युईटी कार्यक्रमांतर्गत पीएन-२४ आणि पीएन-२५ या रस्त्यांच्या प्रकल्पाची कामे सुरू आहेत. मात्र ही कामे ठेकेदार संथ गतीने करीत असल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधी करीत आहेत. प्रलंबित रस्त्यांच्या कामाला गती देऊन मे महिन्याच्या अगोदर सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले.
पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना जोडणाऱ्या रस्त्यांमध्ये सुधारणा करण्याबाबत मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत मंत्री श्री. चव्हाण बोलत होते. बैठकीला आमदार सर्वश्री भीमराव तापकीर, संग्राम थोपटे, संजय जगताप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे, मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता श्री. बहिर, कार्यकारी अभियंता अजय भोसले यांच्यासह रस्ते ठेकेदार, अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले की, रस्ते कामातील अडचणीसंदर्भात अधिकारी-लोकप्रतिनिधी यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी पाहणी करून मार्ग काढावा. अचडणी तातडीने सोडवून रस्ते कामांना गती द्यावी. सामान्य जनतेसाठी रस्ते महत्त्वाचे आहेत. रस्त्यांची वर्दळ, अपघातात वाढ होत असल्याने भूसंपादन सक्तीने करणे अपरिहार्य आहे का हे अधिकाऱ्यांनी तपासून घ्यावे. रस्त्यांच्या कामांसाठी आवश्यक निधी त्वरीत उपलब्ध करुन दिले जाईल, असेही श्री.चव्हाण म्हणाले.
वेल्हे तालुक्यातील तोरणा किल्ल्याकडे जाणारा महाड-मेढेघाट चेलाडी रस्ता, खानापूर ते पानशेत रस्ता, हवेली तालुक्यातील सिंहगड किल्ल्याकडे जाणारा डोणजे कोंढणपूर-खेड शिवापूर रस्ता आणि पुरंदर तालुक्यातील पुरंदर किल्ल्याकडे जाणारा रस्ता सासवड-कापूरहोळ या रस्त्यांची कामे काही तांत्रिक बाबीमुळे काही ठिकाणी झालेली नाहीत. सासवड गाव ते कापूरहोळ रस्त्यासाठी नवीन निविदा मागवून काम करावे. हे काम ४० दिवसात पूर्ण करावे. पौड-कोळवन-लोणावळा-कालेगाव २०० मीटर रस्ता डांबरीकरणाऐवजी सिमेंट काँक्रिटचा करावा, असेही मंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले.
खानापूर ते पानशेत यादरम्यान आवश्यकता असलेल्या ठिकाणी लहान पुलांची उभारणी १५ दिवसांत पूर्ण करावी. पुणे-खडकवासला दरम्यान वन जमिनीची समस्या दूर करून नांदेड सिटी ते किरकटवाडी फाट्यादरम्यान तीन लहान पूल मंजूर असून त्याचे कामही गतीने करण्याच्या सूचना श्री. चव्हाण यांनी दिल्या.