बारामती ! शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘मिशन थायरॉईड’ अभियानाचे आयोजन
बारामती, दि. ३१: वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाअंतर्गत रुग्णसेवेसाठी व विविध रोगांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी विविध अभियान सुरु केले आहेत. त्यानुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती येथे ‘मिशन थायरॉईड अभियान’ अंतर्गत ३० मार्चपासून थायरॉईड बाह्य रुग्ण विभाग सूरू करण्यात आला आहे.
थायरॉईड बाह्य रुग्ण विभागाच्या उद्घाटन प्रसंगी अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, उप अधिष्ठाता डॉ. अंजली शेटे, औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राहुल मस्तुद, समाजसेवा अधीक्षक डॉ. तुषार सावरकर, सहायक अधिसेविका शांता बिराजदार आदी उपस्थित होते.
यावेळी अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांनी थायरॉईडची व्याप्ती, त्याचे लक्षणे व त्यामुळे होणारे दुष्परिणाम याबाबत माहिती दिली. औषधशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मस्तुद यांनी या ओपीडीमुळे रुग्णांना कोणकोणत्या सेवा देण्यात येणार असून त्याद्वारे आरोग्याच्या समस्यांवर कशी मात करता येईल याबाबत माहिती दिली.
या अभियानाचे समन्वयक म्हणून समाजसेवा अधिक्षक डॉ. तुषार सावरकर हे काम पाहत आहेत.
मिशन थायरॉईड:
मिशन थायरॉईड या अभियानाचे उद्दिष्ट थॉयराईड रोगासंदर्भात जनजागृती करणे व त्यासंबधात सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये थायरॉईड उपचारांसाठी विविध सोयी उपलब्ध करुन देणे हा आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दर गुरुवारी दुपारी १२ वाजता औषधवैद्यकशास्त्र विभागाअंतर्गत विशेष थायरॉईड ओ. पी. डी. चालविली जाणार असून त्यामध्ये फिजिशियन, सर्जन, एंडोक्रिनोलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, सोनोलॉजिस्ट, बायोकेमिस्ट आदी तज्ज्ञांचा एकत्र समावेश राहणार आहे.
साधारणपणे प्रत्येकी १ लाख महिलांमागे अंदाजे २ हजार महिलांना दृश्य स्वरुपात थायरॉईडची गाठ मानेवर दिसून येते. त्याचप्रमाणे अनेक महिलांना थायरॉईडची गाठ मानेवर दिसत नसताना देखील विविध थायरॉईडचे आजार झालेले आहेत. त्यातील बऱ्याचशा थायरॉईडच्या आजारांचे दीर्घकाळापर्यंत निदान देखील होत नाही अशा महिला, पुरुष आणि बालकांनादेखील या अभियानाचा फायदा होणार आहे.
अनेकदा थायरॉईडच्या रोगांनी ग्रस्त महिला आणि पुरुषांना आळस, सूस्तपणा, शरीरावर सूज येणे, भूक न लागतादेखील वजन वाढणे, आवाजात एकप्रकारचा जाडपणा अथवा घोगरेपणा येणे ही लक्षणे थायरॉईड ग्रंथींचे काम मंदावल्याचे दर्शवितात. अनेकदा अशा महिलांना वारंवार गर्भपाताला सामोरे जावे लागते. नवजात बालकांमध्ये थायरॉईड ग्रंथींच्या स्रावाअभावी मानसिक दुर्बल्य येऊन अशी बालके लहान खुरी व मंदबुद्धी होऊ शकतात. थायरॉईड ग्रंथींच्या अतिस्रावामुळे अतिजास्त रोडपणा, छाती धडधड करणे व क्वचितप्रसंगी डोळे बाहेर येणे अथवा अंधत्वदेखील येऊ शकते.