महानिर्मिती जैव इंधन वापर कार्यशाळेची संकल्पना
भारत देशातील वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि तापमान वाढ लक्षात घेता औष्णिक विजेची मागणी सातत्याने वाढतच आहे. त्यामुळे विद्युत उत्पादनात कोळशा सोबत मिश्रित स्वरूपात ५ टक्के जैव इंधनाचा वापर करणे ही मध्यवर्ती संकल्पना आहे.
शेतीतला उरलेला कूडाकचरा, वाया गेलेले अन्न आणि कुठल्याही प्रकारच्या सेंद्रीय कचऱ्यात (थोडक्यात बायोमास) उष्णता ऊर्जा तयार करण्यासाठी वापरले जाण्याची क्षमता असते. बायोमासचे रूपांतर जैवइंधनात प्रभावीपणे करता येते. काही अंदाजांनुसार भारतात साधारणपणे २३५ मेट्रिक टन शेतीतला उरलेला कूडाकचरा तयार होतो. या अधिकच्या उरलेल्या कूडाकचऱ्याचा पेलेट्सच्या माध्यमातून वापर केल्यास देशाच्या ऊर्जा गरजेचा काही भाग पुरवता येऊ शकतो, ज्यातून शेतकऱ्यांसाठी अधिकचे उत्पन्न मिळवण्याचे मार्ग आणि ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मिती घडू शकते.
येत्या दशकांमध्ये देशातील ऊर्जा क्षेत्रात आणि वाहतुक क्षेत्रांमध्ये जैव ऊर्जेचा वापर वाढवणे, स्वदेशी कच्च्या टाकाऊ कृषीमालाचा प्रभावी वापर करून पेलेट्स निर्मिती करणे, ज्यातून कोळशासारख्या खनिज इंधनाला काही प्रमाणात का होईना वाढता पर्याय निर्माण होऊन त्यायोगे राष्ट्रीय ऊर्जा सुरक्षिततेला व प्रदूषणमुक्तीला हातभार लागेल.
स्थिरस्थावर आणि बळकट पुरवठा साखळीतून ग्रामीण व शहरी भागांमध्ये रोजगाराच्या संधी तयार होतील. छोट्या शेतकऱ्यांपासून कारखान्यांपर्यंत रोजगाराच्या संधींमध्ये वाढ व्हायला मदत होईल. नव्या व्यवसायांमुळे यात भरच पडेल. उत्पन्नाच्या अधिकच्या स्त्रोतांमुळे अनेकांच्या राहणीमानात सुधारणा घडेल. पारदर्शक बाजारामुळे व्यापाराच्या उत्तम पद्धती वापरात येतील, ज्यातून पारंपारिक व्यवसायांना नवा चेहरा लाभेल.
जैव इंधन तंत्रज्ञान, संधी, आव्हाने,संशोधन, बाजारपेठ विश्लेषण आणि कर्ज उपलब्धता इत्यादी बाबींवर या कार्यशाळेत विचारमंथन होणार आहे. या कार्यशाळेमध्ये केवळ निमंत्रित सदस्यांना सहभागी होता येणार आहे.