Type Here to Get Search Results !

महिला दिनानिमित्त बचत गट सदस्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन

महिला दिनानिमित्त बचत गट सदस्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन
पुणे :- भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या. पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृह येथे नागरी सहकारी बँका,पतसंस्थेच्या महिला संचालिका, सभासद व स्वयंसहाय्यता महिला बचत गटातील महिलाकरीता एक दिवसीय महिला प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 

कार्यक्रमाला माजी महापौर कमल व्यवहारे, माहिती उपसंचालक डॉ.पुरुषोत्तम पाटोदकर, महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या मानद सचिव विद्या पाटील, शिक्षण-प्रशिक्षण मुख्याधिकारी एम.डी. भोईर, सहकारी संस्था सहनिबंधक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली रावल-ठाकुर, सहकारी संस्था पुणे ग्रामीणचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप आदी उपस्थित होते.

आंतराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शुभेच्छा देवून श्रीमती व्यवहारे म्हणाला, सहकार क्षेत्रात महिलांना स्थान देण्यात आल्यामुळे त्यांना प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. सहकार क्षेत्रात महिलांनी चांगली कामगिरी केली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी संघ सर्व सहकारी संस्थाची शिखर संस्था म्हणून कार्य करते. सहकारी संस्थेच्या माध्यमातून अडीअडचणी सोडविण्याचे काम करण्यात येते. संघाच्यावतीने आयोजित महिला प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेवून कार्यरत क्षेत्रात इतरांनाही त्यांचा लाभ द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

आजच्या युगात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करीत आहे, ही अभिमानाची बाब आहे. संचालकांनी बँकेत, पतसंस्थेत काम करतांना नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याकडे लक्ष द्यावे.  काम करीत असतांना आपले आरोग्य जपले पाहिजे. उत्तम आरोग्यामुळे आपल्यामध्ये सकारात्मक अंगी उर्जा येते. एकूणच आपल्या कार्यप्रणालीवर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो, असेही श्रीमती व्यवहारे म्हणाल्या.

उपसंचालक डॉ. पाटोदकर म्हणाले, सहकार क्षेत्रात महिला महत्वाची भूमिका बजावत आहेत. आज विविध क्षेत्रात महिलांनी आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवला आहे. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून महिला स्वत:ची प्रगती करण्यासोबत इतरांनाही सहाय्य करू शकतात. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेऊन आपआपल्या क्षेत्रात प्रगती करावी तसेच इतरांनी प्रोत्साहित करावे, असे आवाहन त्यांनी केले.

 महाराष्ट्र राज्य सहकारी संघामार्फत राबविण्यात येत असलेले उपक्रम आणि बचत गटाच्या माध्यमातून समाजात होत असलेले चांगले काम इतरांनाही प्रेरणादायी ठरण्याच्यादृष्टीने समाजासमोर आण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत शासनाच्या लोककल्याणकारी उपक्रम, योजना, ध्येयधोरणांची प्रसिद्धी करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.


श्रीमती  पाटील म्हणाल्या, महिलांचे जीवन संघर्षमय आहे. या संघर्षरुपी जीवनातून मार्ग काढत काढत संसाराचा गाडा पुढे नेत असतात. महिलांना दिलेले जबाबदारी त्या चिकाटीने पार पाडतात.

श्रीमती भोईर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. महाराष्ट्र राज्य सहकारी संघांतर्गत 33 जिल्हा सहकारी मंडळे, व 13 सहकार प्रशिक्षण केंद्रामार्फत काम करण्यात येते, अशी माहिती त्यांनी दिली.

महिला प्रशिक्षण कार्यक्रमात पुणे पिपल्स को-ऑप बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सदानंद दिक्षित यांनी सद्यस्थितीत सहकारी बॅंकिग,पतसंस्थाबाबत होत असलेले बदल व भविष्य वेध, बँकिग रेग्युलेशन कायद्यातील महत्वाचे बदल आणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची भुमिका व अपेक्षा याबाबत माहिती दिली. सुनिल शेटे यांनी व्यक्तिमत्व विकास, वेळेचे व्यवस्थापन, व्यावसाय मार्गदर्शन, श्री. सावंत यांनी महिलांसाठीचे व्यवसाय व त्यासाठी लागणारे अर्थसह्याय आणि महिला सल्लागार भाग्यश्री साळुंके यांनी महिलांचे सक्षमीकरण या विषयावर मार्गदर्शन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test