पुणे महानगरपालिकेत समाविष्ट ३४ गावांच्या पायाभूत सुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : राज्य शासनाने पुण्याच्या हद्दीलगतची २३ गावे सन २०२१ मध्ये पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी २०१७ मध्ये ११ गावे समाविष्ट झाली आहेत. पायाभूत सुविधा व नियोजनबद्ध विकास व्हावा, यासाठी या गावांचा महानगरपालिकेत समावेश केला आहे. या 34 गावांच्या पायाभूत सुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.
सदस्य सुनील टिंगरे यांनी पुणे महानगरपालिकेत समाविष्ट 23 गावांच्या पायाभूत सोयी सुविधांच्या गैरसोयीबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, पुणे महानगरपालिकेत समाविष्ट 34 गावांपैकी 11 गावांसाठीचा विकास आराखडा पुणे महानगरपालिकेमार्फत तयार करण्यात येत आहे. तसेच 23 गावांसाठीचा विकास आराखडा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मार्फत तयार करण्यात येत आहे. 1200 कोटींचा अंतिम आराखडा तयार करण्यात आला आहे. या गावांसाठीच्या पाणीपुरवठा योजना, सांडपाणी व्यवस्थापन योजना व इतर सर्व योजनांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. या गावांना सर्व मूलभूत सोयी देण्यासाठी शासन सकारात्मक भूमिकेत आहे.
लोकसंख्येचा विचार करून नगरसेवकांची संख्या ठरवण्यात येते. फेररचनेमध्ये नगरसेवकांच्या संख्येबाबत सर्वंकष विचार करण्यात येईल असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्ष नेते अजित पवार, सदस्य संजय जगताप, अशोक पवार यांनी सहभाग घेतला