मु. सा. काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर बिनविरोध निवड
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर, येथील मु. सा. काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या व्यवस्थापन परिषदेवर सदस्य म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड मु. सा. काकडे महाविद्यालय आणि सोमेश्वर - बारामती परिसरातील अत्युच्च बहुमान मानला जातो आहे. यापूर्वी डॉ. वायदंडे यांची विद्यापीठाच्या अधिसभेवर सदस्य म्हणून प्राचार्य गटातून बिनविरोध निवड झाली होती. प्राचार्य डॉ. वायदंडे यांनी यापूर्वीही विद्यापीठाच्या विविध समित्यांवर काम केले आहे. अधिसभा, अभ्यास मंडळ, तक्रार निवारण समिती, महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथ निवड समितीचे सदस्य म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्रातील विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थांशी त्यांच्या अत्यंत जवळचा संबंध आहे. यापूर्वी बारामती परिसरातून सौ. नंदाताई पवार, तसेच मागीलवेळी सुनेत्राताई पवार यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीवर काम करायला संधी मिळाली होती. प्राचार्य डॉ. वायदंडे यांच्या निवडीने महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करून आनंद व्यक्त केला. महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीशराव काकडे, महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष अभिजीत काकडे व सतीश लकडे यांनी त्यांचे अभिनंदन केले.