Type Here to Get Search Results !

बारामतीत महाराजस्व अभियानांतर्गत शिबिराचे आयोजनयोजनांचा गतीने लाभ देऊन ‘महाराजस्व अभियान’ यशस्वी करावे- प्रांताधिकरी दादासाहेब कांबळे

बारामतीत महाराजस्व अभियानांतर्गत शिबिराचे आयोजन

योजनांचा गतीने लाभ देऊन ‘महाराजस्व अभियान’ यशस्वी करावे- प्रांताधिकरी दादासाहेब कांबळे

 बारामती : सर्व विभागांनी 'महाराजस्व' अभियान यशस्वीपणे राबवून लाभार्थ्यांना विविध योजना व सेवांचा लाभ गतीने आणि विहित कालमर्यादेत पुरवावा, असे आवाहन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले. 

उप विभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय व अन्य सर्व शासकीय कार्यालयांच्या संयुक्त विद्यमाने ‘महाराजस्व अभियान शिबिराचे आयोजन बारामतीतील जिजाऊ मंगल कार्यालयात करण्यात आले. या शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे बोलत होते. 

कार्यक्रमास तहसिलदार विजय पाटील, परिविक्षाधीन तहसिलदार नेहा शिंदे, निवासी नायब तहसिलदार विलास करे, नायब तहसिलदार डॉ. भक्ती सरोदे-देवकाते, उप मुख्याधिकारी पदमश्री दाईंगडे, तालुका कृषि अधिकारी सुप्रिया बांदल, सहायक मोटार वाहन निरीक्षक प्रियांका सस्ते, परिविक्षाधीन-नायब तहसीलदार तुषार गुजवटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व लाभार्थी  उपस्थित होते.

यावेळी श्री. कांबळे  म्हणाले, नागरिकांना विविध विभागातील योजनांचे लाभ एकाच ठिकाणी मिळावेत यासाठी तालुका स्तरावर लोकाभिमुख महाराजस्व अभियानांतर्गत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात विविध विभागाचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. नागरिकांनी  स्टॉलला भेट देवून योजनांची माहिती घ्यावी. जिल्ह्यामध्ये बारामती तालुक्यात कमी कालावधीत सर्वात जास्त फेरफारच्या नोंदी  निर्गत झाल्या असून त्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी महसूल प्रशासनाचे कौतुक केले आहे. 

सर्वच विभागांनी यापुढेही असेच चांगले काम करून शासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी कार्यरत रहावे. या अभियानांतर्गत विविध प्रकारच्या योजनांसह भूसंपादनाच्या नोंदी निर्गत करण्यात येणार आहेत. तालुक्यातील मंडल कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातही हे अभियान राबविण्यात येत असून याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

तहसिलदार विजय पाटील म्हणाले, प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक होण्यासाठी तालुका स्तरावर महाराजस्व अभियान राबविण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. हे अभियान ३० एप्रिल पर्यंत राबविण्यात येणार आहे. शासकीय विभागाकडून दिले जाणारे परवाने, दाखले, प्रमाणपत्रे आदींसह गावातील रस्ते, वहिवाटीचे कामे, फेरफार नोंदी निर्गत करणे, अतिक्रमण काढणे, अकृषिक परवाना आदी प्रलंबीत असलेल्या कामांचा निपटाराही या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. नागरिकांनी या अभियानाची जन जागृती करावी, असेही ते म्हणाले.

कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते काही लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभाचे वितरण करण्यात आले. 

या प्रसंगी तहसिल कार्यालय, बारामती नगरपरिषद, सामाजिक वनीकरण विभाग, पंचायत समिती, कृषि विभाग, उप प्रादेशिक परिवहन विभाग, उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय इत्यादी विभागांचे स्टॉल्स लावण्यात आले होते.

अभियानांतर्गत असे दिले लाभ:
महाराजस्व अभियानांतर्गत २६ जानेवारी पासून ५५८ शिधापत्रिका, ३९२ लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजना अनुदान पत्र, १० लाभार्थ्यांना नैसर्गिक आपत्ती अंतर्गत ४१ हजार रुपयांचे अनुदान वाटपाचे पत्र, २ भोगवटा सनद, उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे १३८ नूतनीकरण परवाना, ८६८ शिकाऊ परवाना, कृषि विभागामार्फत कृषि यांत्रिकीकरण उप अभियान सन २०२२-२३ अंतर्गत २ ट्रॅक्टर, १ मेकॅनिकल रिव्हर्सिबल सिंगल पल्टी नांगर, १ रोटाव्हेटर, पंचायत समिती कडून ९३-३ एचपी पाणबुडी मोटार, ७६- ५ एचपी पाणबुडी मोटार, ३६ सरी रिझट, ८१ ताडपत्री, २२ क्रेटस, ६० बॅटरी पंप, बारामती नगरपरिषद मार्फत ३६८ लाभार्थ्यांना पंतप्रधान स्वनिधी प्रमाणपत्र व उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडून १५५ मोजणीचे नकाशे वाटप इत्यादींचे वितरण करण्यात आले.   

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test