सोमेश्वरनगर ! मु.सा.काकडे महाविद्यालयात 'निर्भय कन्या अभियान योजना' अंतर्गत व्याख्यान आणि स्वसंरक्षण कराटे प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न.
सोमेश्वरनगर - निर्भय कन्या अभियान कार्यशाळा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ आणि मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर( ता बारामती) विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनींसाठी 'निर्भय कन्या योजना' अंतर्गत व्याख्यान आणि स्वसंरक्षण कराटे प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार दि. १७ फेब्रुवारी २०२३ रोजी करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन सकाळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवीदास वायदंडे व उपस्थित वक्ते 'ॲड. गौरी सोमण, (ऍडव्होकेट, बारामती),डॉ. जयश्री भिलारे (साई सेवा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड आयसीयू वाघळवाडी सोमेश्वर नगर), निखील नाटकर (कराटे प्रशिक्षक) यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य व उपक्रमाचे समन्वयक, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. जगन्नाथ साळवे यांनी प्रास्ताविक केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी उपस्थित व त्यांचे स्वागत केले आणि मनोगत व्यक्त केले. मुलींमध्ये निर्भयता निर्माण करणे हे चांगले शिक्षणाचे कार्य असते. विद्यापीठ नेहमीच विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासासाठी सतत कार्यशील असून स्त्री सशक्तिकरणाची संकल्पना या शैक्षणिक वर्षाची मूळ संकल्पना आहे. स्त्री ही मन, मनगट व मेंदूने सक्षम झाली पाहिजे. जागृतीची प्रक्रिया उद्युक्त करणं हाच या कार्यक्रमाचा हेतू आहे. महिलांसाठी कायद्याबद्दल जाणीवजागृती निर्माण होऊन आज प्रत्येक विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षणाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. उद्घाटन सत्राचे आभार उपप्राचार्य डॉ. जया कदम यांनी मानले.
उद्घाटन समारंभानंतर प्रथम सत्रामध्ये ॲड. गौरी सोमण यांनी 'स्त्रियांचे कायदे आणि संरक्षण' या विषयावर मार्गदर्शन केले. "संविधानामध्ये कलम १२ ते ३० मध्ये महिलांसाठी हक्क दिलेले आहेत. सध्या इन्स्टा, फेसबुक, व्हाट्सअप, इंटरनेट, ई-मेल यावरून त्रास देण्याचे प्रकार वाढत आहेत. मुलांचे वय हे शिक्षणाचे असून शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. बाकीच्या गोष्टी ओघाने येणार आहेत असे प्रतिपादन त्यांनी. विद्यार्थिनींनो तुम्ही निर्भय बना पण फक्त बोलण्यापुरते निर्भय होऊ नका, विचाराने निर्भय व्हा व कायद्याचा गैरवापर करू नका." असा बहुमोल सल्ला त्यांनी आपल्या मार्गदर्शनात दिला.
यानंतर डॉ. जयश्री भिलारे यांनी 'महिलांचे आरोग्य व घ्यावयाची काळजी' या विषयावर बोलत असताना स्त्रीने स्वतःच वेगळेपण जपलं पाहिजे. स्वतःच्या असणाऱ्या विविध कौशल्यांचा विकास करत असताना दैनंदिन धावपळीच्या जीवनात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे असा सल्ला दिला. बेकरीजन्य पदार्थांचे अतिसेवन टाळले पाहिजे. जाहिरातींच्या मागे न लागता सकस आहाराकडे लक्ष दिले पाहिजे. जेवणाच्या वेळांमधील बदल, व्यायामाचा अभाव, चुकीचा आहार आरामदायक जीवनशैलीमुळे शरीरामधील लवचिकता कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्य यांचा आहारात समावेश असावा. जीवनसत्वाच्या अभावामुळेच त्वचा विकार व केसांच्या आरोग्य धोक्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. स्त्रियांमध्ये वाढणाऱ्या गर्भाशयाचे कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर यावरती उपाय म्हणून वयाच्या चाळीस वर्षानंतर प्रत्येक वर्षी तपासणी करून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. स्वच्छता, योग्य आहार, योगासन, व्यायाम, ताणतणावाचे व्यवस्थापन करणे या गोष्टी तुम्हाला गोळ्या औषधांपासून दूर ठेवतील असा सल्लाही त्यांनी दिला. शरीराच्या नैसर्गिक चक्रामध्ये बिघडणं आणता ते सुरळीत चालण्यासाठी दैनंदिन जीवनशैलीमध्ये केलेले छोटे छोटे बदल तुम्हाला भविष्यातील मोठ्या धोक्यांपासून दूर ठेवू शकतात असे आवाहन त्यांनी केले. दिवसातून किमान दोन लिटर पाणी पिल्याने आपण दिवसभर ताजेतवाने राहू हे गुपितही त्यांनी सांगितले. विद्यार्थिनींना कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास त्यांनी संपर्क क्रमांक देऊन वैयक्तिक संपर्क करण्यास चे आवाहन केले.
दुसऱ्या सत्रामध्ये निखील नाटकर यांनी 'स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण, या विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी स्वतःच्या संरक्षणासाठी तयार राहायला हवे, मनातील भीती काढून जशास तसे प्रत्युत्तर देण्यासाठी सक्षम व्हायला हवे, कोणत्याही छेडछाडकडे डोळेझाक न करता विद्यार्थिनींनी निर्भयपणे त्याचा प्रतिकार करायला हवा असा सल्ला त्यांनी आपल्या प्रशिक्षणादरम्यान दिला. प्रशिक्षणामध्ये विद्यार्थिनींना स्वसंरक्षणासाठी वेगवेगळ्या कराटेच्या ट्रिक्स शिकवल्या गेल्या. "स्वसंरक्षण प्रशिक्षणातूनचआपण सर्वजणी निर्भय होऊ शकाल. " असे प्रतिपादन त्यांनी केले.
शेवटी उपस्थित विद्यार्थिनींसाठी प्रश्न व उत्तरांसाठी सत्र खुले करण्यात आले. यामध्ये विद्यार्थीनींनी आपले प्रश्न विचारले व वक्त्यांनी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. उपस्थित विद्यार्थिनींनीमध्ये तृतीय वर्ष कलाची विद्यार्थिनी वैष्णवी पवार, द्वितीय वर्ष बीसीएची विद्यार्थिनी आगम गायत्री, सायली चौधरी द्वितीय वर्ष बीबीए सी. ए. या विद्यार्थिनींनी प्रतिनिधिक मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील एकूण ११५ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कल्याणी जगताप यांनी केले तर प्रा. मृणालिनी मोहिते यांनी आभार व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग डॉ. राहुल खरात, प्रा. अच्युत शिंदे, प्रा.वनिता कांबळे, प्रा.शिल्पा कांबळे, प्रा. नीलम देवकाते, प्रियांका तांबे, नीलिमा निगडे, प्रा. आशा दीक्षित, प्रा.प्राजक्ता शिंदे,ऍड. गौरी सोमण इ. उपस्थित होते.