सोमेश्वरनगर ! काकडे महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन संपन्न
सोमेश्वरनगर - मराठी विभागाच्या वतीने कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्ताने मराठी राजभाषा गौरवदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून केले. डॉ.जया कदम यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविक करताना त्या म्हणाल्या की, "एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की भाषा संपली की संस्कृती संपणार; संस्कृती संपली की माणूस संपणार आहे; आणि माणूस संपला म्हणजे समाज संपणार आहे. आपला माणूस, आपला समाज, आपली संस्कृती टिकवायची असेल तर आपल्याला भाषा ही टिकवावीच लागणार आहे. हे वास्तव आपण स्वीकारावे, अंमलात आणावे. केवळ एक दिवस नाहीतर प्रत्येक दिवस हा आपल्या मायबोलीचाच मानला गेला पाहिजे.शासनाबरोबर मराठी भाषा टिकवणे आणि ती अधिकाधिक समृद्ध करणे ही आपलीही जबाबदारी आहे." मार्गदर्शक वक्ते म्हणून डॉ. प्रवीण ताटे देशमुख उपस्थित होते. यांनी ''भाषा , साहित्य , संस्कृती आणि शैक्षणिक धोरण" या विषयावर अतिशय अभ्यासपूर्ण आणि सोप्या शैलीत मराठीच्या अस्तित्वाचा आणि भवितव्याचा वेध घेतला. ते म्हणाले की, " जर विद्यार्थ्यांना कळणार्या भाषेत शिक्षण दिलं तरच खर्या अर्थानं शिकणं होईल आणि संशोधक तयार होतील. जपान आणि जर्मनी देशात तेथील स्थानिक भाषेत शिक्षण दिलं जाते. त्यामुळे संशोधनाला अधिक चालना मिळाली. भारतात अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना न कळणार्या भाषेत शिक्षण दिलं जातं. ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. कोणतीही भाषा येणं म्हणजे ज्ञान नाही. भाषा हे माध्यम आहे आणि शिक्षणाचे माध्यम जर मातृभाषा असेल तर ते आकलनासाठी अधिक सुलभ असेल म्हणूनच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषा व स्थानिक भाषेला अधिक महत्त्व दिले आहे."