वैयक्तिक शेततळ्यासाठी....या पोर्टलवर अर्ज करा..!
बारामती : मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळ्यासाठी बारामती कृषि उप विभागातील शेतकऱ्यांनी महा-डीबीटी संकेस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन उप विभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.
मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे या बाबीचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत बारामती तालुक्यात ७३.६० लाख, दौंड- ३८.२३ लाख, इंदापूर- ६५.८५ लाख आणि पुरंदर तालुक्यासाठी ८६.५६ लाख असे एकूण २६४.२४ लाख लक्षांक प्राप्त झाले आहेत. शेततळे अनुदानाच्या रकमेत ५० टक्के वाढ करण्यात आली असून शेतकऱ्यांना ७५ हजार रुपये अनुदान मिळणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर किमान ०.६० हेक्टर आर क्षेत्र असावे. शेततळ्याची जमीन तांत्रिकृष्ट्या योग्य असावी. अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी शेततळ्याच्या कोणत्याही योजनेतून लाभ घेतलेला नसावा. ५ टक्के दिव्यांग लाभार्थी आणि उर्वरित पैकी ७० टक्के पुरूष व ३० टक्के महिला या प्रमाणात लाभार्थ्यांना लाभ देण्यात येईल.
*'महा-डिबीटी' पोर्टलवर असा करावा अर्ज*
शेतकऱ्यांनी 'महा-डिबीटी' या संकेस्थळावर 'शेतकरी योजना' हा पर्याय निवडावा. या अंतर्गत 'वैयक्तिक शेततळे' ही बाब निवडून इनलेट व आऊटलेट विरहित किंवा इनलेट व आऊटलेटसह यापैकी गरजेनुसार एक उपघटक निवडावा. त्यानंतर शेततळे आकारमान व स्लोप निवडावा. याप्रमाणे अर्ज भरल्यानंतर ऑनलाईन सोडतीद्वारे निवडीची प्रक्रिया करण्यात येते.
अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. तांबे यांनी केले आहे.