सोमेश्वरनगर ! मु. सा. काकडे महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी.
सोमेश्वरनगर,दि. २० फेब्रुवारी २०२३ : महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या वतीने संपूर्ण राज्यभर बेमुदत राज्यव्यापी कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यामध्ये बारामती तालुक्यातील मु. सा. काकडे महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झालेले आहेत. सध्या वरिष्ठ महाविद्यालयाच्या द्वितीय व तृतीय वर्ष कला या वर्गातील विद्यार्थ्यांच्या विद्यापीठ परीक्षा चालू आहेत. उद्यापासून बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू होत आहेत. या सर्व कामकाजावर महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारात धरणे देऊन बहिष्कार नोंदविला. तसेच, कोणतेही दैनंदिन प्रशासकीय कामकाज केले जाणार नाही अशी माहिती शिक्षकेतर संघटनेच्या स्थानिक शाखेचे अध्यक्ष अमोल काकडे यांनी दिली. तसेच आपल्या हक्काची जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, आपल्या हक्काचे १२ व २४ वर्षांनी मिळणाऱ्या आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळावा, ७ व्या वेतन आयोगाच्या माध्यमातून १०,२०,३० सुधारित लाभाची योजना मिळावी , ५८ महिन्याची थकबाकी मिळावी, कर्मचारी भरती करून रिक्त पदे भरली जावीत अशा विविध मागण्या मान्य व्हाव्यात अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
या आंदोलनास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी पाठिंबा दर्शविला. तसेच, पुक्टोचे सेक्रेटरी डॉ. प्रवीण ताटे देशमुख यांनी आंदोलन अधिक तीव्र करावे असे प्रतिपादन केले व पुक्टोच्या स्थानिक शाखेच्या वतीने या आंदोलनास आपला पाठिंबा दर्शविला. यावेळी महाविद्यालयाचे कार्यालय अधीक्षक . सतीश लकडे व अन्य शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.