Type Here to Get Search Results !

होळ ! शाळेतल्या दुर्धर आजारग्रस्त मित्राला सवंगड्यांची लाख मोलाची मदतआनंद विद्यालयाच्या सण१९९४-९५ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न.

होळ ! शाळेतल्या दुर्धर आजारग्रस्त मित्राला सवंगड्यांची लाख मोलाची मदत

आनंद विद्यालयाच्या सण१९९४-९५ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न.
सोमेश्वरनगर - दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या आपल्या शाळकरी मित्राला मदत म्हणून त्याच्या पत्नी व मुलीस वर्गमित्रांनी सुमारे एक लाख ऐंशी हजार रूपयांची मदत मिळवून देत शाळेतल्या मैत्रीचे बंध आणखीनच मजबूत केले.

बारामती तालुक्यातील होळ येथील आनंद विद्यालयाच्या १९९४-९५ च्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्याच वर्गातील युवराज कोंढाळकर हा गेले सोळा वर्ष अंथरुणाला खिळून असल्याचे समजताच त्याच्या वर्गमित्रांनी एकत्र येत त्याच्यासाठी मदत गोळा करण्याचे आवाहन आपल्याच शाळेच्या सोशल मिडियावरील गृपच्या माध्यमातून केले. त्या आवाहनाला उदंड प्रतिसाद देत त्याच्या मित्रांनी आठवडाभरातच तब्बल एक लाख ऐंशी हजार रूपयांची आर्थिक मदत गोळा केली. यासाठी गृपमधील सर्वच सदस्यांकडून यथाशक्ती मदत देण्यात आली. कोणी पाचशे रूपये दिले तर कोणी अगदी पंचवीस हजार रूपये देत आपल्या मित्राला हलाखीच्या परिस्थितीतून सावरण्यासाठी हातभार लावला.

सदर जमा झालेली सर्व रक्कम युवराज कोंढाळकर यांची पत्नी व दहावीत शिकत असलेल्या मुलीच्या नावे बँकेत ठेव म्हणून ठेवण्यात आली असून त्याची पावती रविवार दिनांक ०८ जानेवारी रोजी अभिषेक मंगल कार्यालयात आयोजित स्नेहसंमेलनात त्याच्या पत्नीच्या हाती सुपूर्द करण्यात आली.

सुमारे दिड महिन्यांपूर्वी होळ येथील आनंद विद्यालयाच्या १९९४-९५ च्या दहावीच्या सवंगड्यांचा एक गृप काढायची कल्पना भालचंद्र भिलारे याच्या मनात आली. त्यासाठी त्याने "पुन्हा एकदा शाळेत" नावाचा गृप सोशल मिडियावर तयार केला आणि आपल्या संपर्कात असलेल्या दहा-पंधरा मित्रांची नावे त्यात जोडली. तसेच ज्यांचे संपर्क नव्हते त्यांची माहीती या सर्व मित्रांनी काढून त्यांचाही गृपमधे समावेश केला. यावेळेस या सर्वांना आपला एक शाळेत असताना अतिशय हुशार असलेल्या युवराज कोंढाळकर या मित्राच्या आजाराविषयी समजले. या सर्वांनी गेले सोळा वर्ष अंथरुणावर खिळून असलेल्या आपल्या मित्रासाठी काहीतरी मदत करायचीच या हेतूने शाळेच्या मित्र मैत्रीणींना मदतीसाठी आवाहन केले. या आवाहनास सर्वांनीच भरभरून प्रतिसाद देत मदत गोळा केली.

गोळा केलेल्या मदतीच्या ठेव पावती गृपच्या स्नेहसंमेलनात आजारी मित्राच्या पत्नी व मुलीस सर्व शाळकरी मित्र मैत्रिणींच्या उपस्थितीत देण्यात आली त्यावेळेस सर्वजण भावूक झाले होते. या आजारातून लवकरच बरा होवून आपला मित्रही आपल्यासोबत येईल अशी अपेक्षा सर्वांनीच व्यक्त केली. या स्नेहसंमेलनात ७० मुलामुलींनी उपस्थिती लावली. या स्नेहसंमेलनासाठी नवनाथ मगर, भालचंद्र भिलारे, संतोष दोशी, शशिकांत फराटे, रितू गायकवाड- मंडलिक, श्रीकांत गहीन, अविनाश होळकर, उमेश दोडमिसे ,कय्युम पठाण, भाऊसो रसाळ यांनी विशेष परिश्रम घेतले. स्नेहसंमेलनात सर्वांनीच आपल्या शाळेतील आठवणींना उजाळा देत "पुन्हा एकदा शाळेत" येण्याचे वचन दिले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test