हायवा उलटल्याने वाहतुकीचा खोळंबा... त्या...पोलीस कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत वाहतूक केली सुरळीत.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी - उसाची मळी वाहतूक करणारा हायवा ट्रक उलटल्याने नीरा बारामती रस्त्यावर वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता.
मळी वाहतूक करणारा हायवा बारामती बाजूकडून नीरा बाजूकडे चालला होता. मात्र पणदरे खिंड येथे उतारावर असताना हायवा ( एम एच ४२ टी ९९९४ ) या मालवाहतूक गाडीचे मागील टायर अचानक फुटल्याने ही गाडी रस्त्याच्या मध्यभागी उलटली. यामध्ये गाडीचे चालक व वाहक यांना किरकोळ दुखापत झाली. मात्र रस्त्याच्या मध्यभागी गाडी उलटल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे वाहतूक विभागाचे कर्मचारी संतोष जावीर यांना ही माहिती कळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र दुपारच्या सुमारास दोन्ही बाजूकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने दोन्ही बाजूकडे वाहनांची मोठी कोंडी झाली होती. कोऱ्हाळे बु. गावाकडे तर चार किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी झाली होती तर पणदरे गावापर्यंत वाहनांची रांग लागली होती. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत वाहतूक सुरळीत केली.