बारामती ! महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक कबड्डी क्रीडा स्पर्धेचे बारामती येथे उदघाटन
बारामती : महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनद्वारा आयोजित महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक कबड्डी क्रीडा स्पर्धेचे उदघाटन महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. खेळाडूंनी क्रीडा सुविधांचा लाभ घेवून महाराष्ट्राचे नावलौकिक वाढवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन श्री. पवार यांनी यावेळी केले.
बारामती येथील विद्या प्रतिष्ठान मैदानात आयोजित या कार्यक्रमाला क्रीडा व युवकचे सह संचालक चंद्रकांत कांबळे, उप विभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कस गावडे, अर्जुन पुरस्कार विजेत्या शकुंतला खटावकर, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
श्री.पवार म्हणाले, बारामतीत येथे कबड्डी स्पर्धा होत असल्याने शहरासह तालुक्यात क्रीडामय वातावरण होण्यास मदत झाली आहे. शासनाने महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक स्पर्धेसाठी १९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक असोसिएशन यांच्यातर्फे महाराष्ट्रातील ९ शहरामध्ये ३९ प्रकारच्या खेळाच्या स्पर्धा भरवण्यात येत आहेत. या स्पर्धेमुळे महाराष्ट्रातील नक्कीच चांगले खेळाडू तयार होतील.
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना महाराष्ट्र शासनाच्या सेवेत सामावून घेतले जात आहे. राज्यात खेळांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहे. यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना नक्कीच चालना मिळून चांगले खेळाडू तयार होतील.
देशी खेळांची लोकप्रियता वाढली पाहिजे. अपयशी होणाऱ्या खेळाडूंनी खचून न जाता पुढील स्पर्धेत यश मिळविण्याची जिद्द बाळगावी. पुन्हा नव्या उत्साहाने खेळायला सुरूवात करावी, असे त्यांनी सांगितले.
मैदानावरील पुरूष गटातील मुंबई शहर, ठाणे, वाशिम तर महिला गटातील पुणे जिल्हा, अमरावती व रायगड या संघाना श्री. पवार यांनी शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविकात जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी कबड्डी स्पर्धेविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाला क्रीडा शिक्षक, पर्यवेक्षक, पंच, शाळेतील विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.