बारामती ! विधान भवनात पत्रकारांची बाजू मांडणार : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले
बारामती: विधान भवनात पत्रकारांची बाजू मांडणार असून त्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी केले.
पत्रकार दिनाचे औचित्य साधून बारामती येथील
डेंगळे गार्डन कसबा या ठिकाणी संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष योगेश नालंदे, मन्सूर शेख, चेतन शिंदे तसेच संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने (दि:५) रोजी पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी नानाभाऊ पटोले बोलत होते.
या प्रसंगी पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार संजय जगताप, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट, आमदार रामहरी रुपनवर, काँगेस ओबीसी विभागाचे प्रदेश अध्यक्ष भानुदास माळी, बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव, उद्योजक कौशल श्रेणीकुमार शहा तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
नानाभाऊ पटोले पुढे म्हणाले, पत्रकारांचा न्याय हक्कासाठी मी विधान सभेत पत्रकारांची बाजू मांडणार. पेपरच्या कागदाचे दर वाढले आहेत त्याचा जीएसटी कमी करणार, शासकीय जाहिराती सरसकट पत्रकारांना लागू करणार, पत्रकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी राखीव कोटा करण्यात यावा, पत्रकार बांधवांसाठी हॉस्पिटलमध्ये जर एखादा वाईट प्रसंग वाढवला तर त्यासाठी एखादी तरतुद करणार तसेच पत्रकारांना विमा संरक्षण मिळण्याची तरतूद करणार, पत्रकार संरक्षण कायदा मजबूत करणार असे अनेक मुद्दे विधान भवनात मांडणार असल्याचे सांगितले.
आयोजित कार्यक्रमांमध्ये पत्रकारिता क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आदर्श पत्रकारिता पुरस्कार तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल उत्कृष्ट सामाजिक कार्य पुरस्कार प्रधान करण्यात आला होता. या मध्ये पत्रकार बांधवांना तसेच सामाजिक कार्यकर्त्यांना पुरस्कार देऊन नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला बारामती, दौंड ,इंदापूर, पुरंदर तसेच फलटण तालुक्यातील दैनिक,साप्ताहिक इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकार बांधव तसेच सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रास्ताविका योगेश नालंदे यांनी केली तर आभार नाना साळवे यांनी मानले.