बारामती ! कबड्डीतील महिलांमध्ये पुणे व रायगडची आगेकूच
बारामती- विजेतेपदासाठी दावेदार असलेल्या पुणे संघाने रायगड व मुंबई उपनगर यांच्यासह राज्य मिनी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या गटात आगेकूच कायम राखली.
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात सुरू असलेल्या या स्पर्धेत पुणे संघाने नागपूर संघाचा ५२-१४ असा धुव्वा उडविला. मध्यंतराला ३६-५ अशी आघाडी घेत त्यांनी आपला विजय निश्चित केला होता. त्याचे श्रेय आम्रपाली गलांडे व अंकिता जगताप यांच्या चतुरस्त्र खेळास द्यावे लागेल. मुंबई उपनगर संघाने आपले पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या मुंबई शहर संघाला ४८-३६ असे पराभूत केले. त्यावेळी पूर्वार्धात त्यांनी २३ विरुद्ध १७ अशी सहा गुणांची आघाडी घेतली होती. मुंबई उपनगर संघाकडून हरदीप कौर, याशिका पुजारी व प्रांजल पवार यांनी अष्टपैलू खेळ केला. मुंबई शहर संघाकडून मेधा कदम व प्रतीक्षा तांडेल यांचे प्रयत्न अपुरे ठरले.
रायगड संघाने अमरावती संघावर ३३-१९ अशी मात केली त्यावेळी पूर्वार्धात त्यांच्याकडे १८-१० अशी आघाडी होती. रायगड संघाच्या या विजयाचे श्रेय तेजा सकपाळ व रचना मात्रे यांच्याकडे द्यावे लागेल. अमरावती संघाकडून बरखा गेडाम व मंगला राऊत यांनी दिलेली लढत अपुरी ठरली.
पुरुष गटात मुंबई शहर संघाने विजयी वाटचाल कायम राखताना धुळे संघावर ४६-१६ असा दणदणीत विजय नोंदविला त्यावेळी मध्यंतराला त्यांनी ३१-१० अशी भक्कम आघाडी घेतली होती. मुंबई शहर संघाच्या या विजयात सुशांत नाईक व मयूर शिवतीर्थकर यांचा महत्त्वाचा वाटा होता. धुळे संघाकडून दिनेश अहिरराव याची लढत एकाकी ठरली.