Type Here to Get Search Results !

पवना शिक्षण संकुलातून पर्यावरणाचे संवर्धन करणारे विद्यार्थी घडावेत-वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

पवना शिक्षण संकुलातून पर्यावरणाचे संवर्धन करणारे विद्यार्थी घडावेत-वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
पुणे, पवना शिक्षण संकुलातून वसुंधरेचे रक्षण करणारे, पवना परिसराला हिरवा शालू घालून पर्यावरणाचे संवर्धन करणारे विद्यार्थी घडावेत, असे प्रतिपादन राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

पवनानगर येथील पवना शिक्षण संकुल येथे आयोजित वृक्षारोपण समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार सुनील शेळके, पुणे महानगर प्रदेश विकास विकास प्राधिकरणाचे आयुक्त राहुल महिवाल, उपवनसंरक्षक राहुल पाटील, पवना प्रॉपर्टी असोसिएशनचे अध्यक्ष पद्मभूषण रजनीकांत श्रॉफ, पवना शिक्षण संकुलाचे सचिव संतोष खांडगे, प्राचार्य भाऊसाहेब आगळमे आदी उपस्थित होते.

श्री. मुनगंटीवार म्हणाले, विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यांनी देशाच्या स्वप्न पूर्तीसाठी प्रयत्न करावे. विद्यार्थ्यांनी जीवनात यश प्राप्तीसाठी प्रचंड मेहनत करावी आणि त्यासोबतच आई-वडिलांची सेवा करावी. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठीदेखील विद्यार्थ्यांनी आपले योगदान द्यावे. शिक्षकांनीदेखील विद्यार्थ्यांना संस्कारक्षम शिक्षण देणे गरजेचे आहे. 

मावळ परिसरातील विद्यार्थ्यांना कृषि विषयाचे अद्यावत व तंत्रशुद्ध शिक्षण मिळावे यासाठी परिसरात कृषि महाविद्यालय स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. कृषि महाविद्यालयासाठी लागणारी जागा जलसंपदा विभागाच्या अधिपत्याखाली असल्याने याबाबत राज्याच्या जलसंपदा मंत्र्याकडे याबाबत पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असेही श्री. मुनगंटीवार म्हणाले.


मावळ परिसर डोंगरखोऱ्यात, निसर्गानी नटलेला परिसर असल्याचे यावेळी आमदार शेळके म्हणाले. परिसरात कृषि महाविद्यालयाची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.

पद्मभूषण श्रॉफ म्हणाले, पवना धरणग्रस्त परिसरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत  असून परिसरात ५० हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. पवना विद्या मंदिर संकुलात विद्यार्थ्यांसाठी ५० स्वच्छतागृहे बांधण्याचे काम सुरु आहेत,असेही ते म्हणाले.


संस्थेचे सचिव श्री. खांडगे  पवना शिक्षण संकुलाबाबत माहिती दिली. 

यावेळी वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.


कार्यक्रमापूर्वी श्री. मुनगंटीवार यांनी पवना प्रॉपर्टी असोसिएशनच्या वतीने करण्यात येणाऱ्या कार्याविषयी माहिती घेतली. त्यानंतर ते म्हणाले, पवना प्रॉपर्टी असोसिएशनने पवना परिसरात ५० हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केल्याने येथील पर्यावरणाचा विकास होण्यास मदत होणार आहे. पर्यावरणाच्या सानिध्यात आल्यास शुद्ध हवा मिळते, मनात शुद्ध विचार येते, शेवटी त्याचे शुद्ध कृतीत रूपांतर होते. या वृक्ष लागवड मोहिमेस वन विभागाच्या वतीने सहकार्य करण्यात येईल, असेही वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test